कॉंग्रेसचे लोकसभेतील नेतेपद चौधरींकडेच कायम

नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज पक्षाच्या संसदीय गटाची पुनर्रचना जाहीर केली. त्यानुसार कॉंग्रेसच्या लोकसभेतील नेतेपदी अधिररंजन चौधरी यांची नियुक्ती कायम ठेवण्यात आली असून पक्षाच्या लोकसभेच्या गटात मनिष तिवारी आणि शशी थरूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कॉंग्रेसचा लोकसभेतील हा गट सात सदस्यांचा आहे. त्यात बाकीचेही सदस्य कायम ठेवण्यात आले आहेत. कॉंग्रेसचे लोकसभेतील उपनेतेपद गौरव गोगोई यांच्याकडेच कायम ठेवण्यात आले आहे. के सुरेश हे लोकसभेतील मुख्य प्रतोद म्हणून काम पहातील.
कॉंग्रेसकडून लोकसभेतील नेतेपद बदलले जाणार असल्याचे संकेत या आधी देण्यात आले होते. पण अधिररंजन चौधरी हेच यापुढेही पक्षाचे लोकसभेतील नेते म्हणून काम पहाणार आहेत.
कॉंग्रेसच्या राज्यसभेच्या गटातही फारसे बदल करण्यात आलेले नाहींत.
मल्लिकार्जुन खरगे हे पक्षाचे राज्यसभेतील प्रमुख म्हणून तर आनंद शर्मा हे उपप्रमुख म्हणून काम पहाणार आहेत. राज्यसभेतील मुख्य प्रतोद म्हणून जयराम रमेश यांची नियुक्ती करण्यात आली आहे.




