Jailer 2 : ‘जेलर २’च्या क्लायमॅक्सने उडवली खळबळ.! ‘या’ बड्या अभिनेत्याच्या एन्ट्रीने ‘जेलर ३’ची उत्सुकता वाढली
‘जेलर २’मध्ये रजनीकांत पुन्हा एकदा टायगर मुथुवेल पांडियन या दमदार भूमिकेत दिसतात. पहिल्या भागाप्रमाणेच यावेळीही त्यांच्या व्यक्तिरेखेत शांतता आणि आक्रमकता यांचा जबरदस्त मेळ पाहायला मिळतो.

Jailer 2 : सुपरस्टार रजनीकांत यांचा बहुप्रतिक्षित ‘जेलर २’ अखेर १५ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये दाखल झाला आणि पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दमदार ॲक्शन, थरारक प्रसंग, विश्वासघात, कुटुंबाच्या सुरक्षेसाठीचा संघर्ष आणि शेवटच्या क्षणी समोर येणारा जबरदस्त ट्विस्ट यामुळे ‘जेलर २’ने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. मात्र, या सगळ्यात सर्वाधिक चर्चा होत आहे ती चित्रपटाच्या क्लायमॅक्सची!
चित्रपट संपतोय असं वाटत असतानाच कथेला अचानक मिळणारी कलाटणी प्रेक्षकांना धक्का देते. त्यातच विजय सेतुपतीची अनपेक्षित एन्ट्री झाल्याने आता या कथेचा पुढचा अध्याय नेमका काय असणार, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. त्यामुळे सोशल मीडियापासून चित्रपटगृहांबाहेरच्या चर्चांपर्यंत एकच सवाल ऐकायला मिळतोय तो म्हणजे ‘जेलर ३’ येणार का?
नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित ‘जेलर २’मध्ये रजनीकांत पुन्हा एकदा टायगर मुथुवेल पांडियन या दमदार भूमिकेत दिसतात. पहिल्या भागाप्रमाणेच यावेळीही त्यांच्या व्यक्तिरेखेत शांतता आणि आक्रमकता यांचा जबरदस्त मेळ पाहायला मिळतो.
यावेळी मुथुवेल पांडियनसमोरचे संकट आणखी मोठे आहे. मूर्ती तस्करी करणाऱ्या एका धोकादायक गँगमुळे मुथु आणि त्याच्या कुटुंबाचे आयुष्य धोक्यात येते. आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी मुथुला पुन्हा एकदा आपल्या भूतकाळातील धाडसी रूपात परतावे लागते.
या संघर्षात मिथुन चक्रवर्तींच्या चक्री कल्पक या व्यक्तिरेखेची भूमिका महत्त्वाची ठरते. मुथुला संपवण्यासाठी आखला गेलेला मोठा कट आणि त्यात मुथुची मुलगी कांता म्हणजेच विद्या बालन अडकणे, यामुळे कथेला वेग येतो.
तस्करीच्या गँगचा मुथु करतो खेळ खल्लास!
चित्रपटाच्या पुढील भागात बोधीची भूमिका साकारणारा एस. जे. सूर्या विमानातून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. मात्र, मुथु त्याला सहजासहजी निसटू देत नाही. मुथुवेल पांडियनसोबत नरसिंहा (शिवराजकुमार), मॅथ्यू (मोहनलाल) आणि कामदेव (जॅकी श्रॉफ) पुन्हा एकत्र येतात. या तगड्या टीमच्या मदतीने बोधीला रोखण्यात येते आणि मूर्ती तस्करी करणाऱ्या गँगचा शेवट करण्याचा मुथुचा प्रयत्न यशस्वी होतो.
इथपर्यंत पाहिल्यानंतर प्रेक्षकांना वाटते की मुथुने अखेर आपल्या कुटुंबावरील संकट दूर केले आहे. पण… खरी खेळी तर त्यानंतर सुरू होते! कुटुंब आता सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतर मुथुवेल पांडियन पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतो. तो आपल्या मुलगा अर्जुनच्या हत्येची कबुली देतो.
यानंतर पोलिस मुथुला बेड्या घालतात आणि त्याला त्याच्या कुटुंबासमोर आणतात. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली आहे, असं वाटत असतानाच कथेत एक जबरदस्त ट्विस्ट येतो. मुथुची मुलगी कांताचा एक व्हिडिओ समोर येतो.
या व्हिडिओमध्ये कांता जखमी अवस्थेत व्हीलचेअरवर बसलेली दिसते. हा व्हिडिओ पाहताच मुथुला जाणवतं की, त्याने ज्या संकटाचा शेवट केला असं समजलं होतं, ते संकट अजून संपलेलं नाही. आता कांताला नेमकं कुणी आणि का लक्ष्य केलं? तिच्यामागे कोण आहे? आणि मुथुवेल पांडियनसमोर आता कोणतं नवीन संकट उभं राहणार? या प्रश्नांमुळे क्लायमॅक्स अधिकच थरारक बनतो.
आणि मग होते विजय सेतुपतीची धडाकेबाज एन्ट्री!
क्लायमॅक्समधील सर्वात मोठा धक्का म्हणजे विजय सेतुपतीची एन्ट्री. मुथुला या व्हिडिओला उत्तर देण्यास सांगणारा पोलीस अधिकारी दुसरा कोणी नसून विजय सेतुपती असल्याचे समोर येते.
याच क्षणी चित्रपटाची कथा एका नव्या वळणावर पोहोचते. विजय सेतुपतीची व्यक्तिरेखा नेमकी कोणत्या भूमिकेत आहे? तो मुथुचा साथीदार आहे की त्याच्यासमोर उभा ठाकणारा नवा शत्रू? कांताच्या व्हिडिओमागे त्याचा काही संबंध आहे का? या प्रश्नांची उत्तरं मात्र पुढील भागासाठी उत्सुकता निर्माण करतात.
विजय सेतुपतीच्या या एन्ट्रीने ‘जेलर ३’च्या चर्चेला अक्षरशः तोंड फुटले आहे. क्लायमॅक्स ज्या पद्धतीने संपवण्यात आला आहे, त्यामुळे पुढील भागासाठी कथानकाची शक्यता निर्माण होते.





