घटना, नियमावली, सदस्य संख्येवरून ठरतो पक्षावर दावा – अॅड. अरविंद आव्हाड

पुणे – आपल्या देशात विविध राज्यांत यापूर्वीही आमदार फुटण्याचे प्रकार घडले. सद्यस्थितीत आमदार हुशार असून ते फुटत नाहीत, तर त्याच पक्षात राहून वेगळा गट तयार करतात. त्यानंतर पक्षावर दावा सांगत निवडणूक आयोगात धाव घेतात. यावेळी निवडणूक आयोग संबंधित पक्षाची घटना, नियमावली यांना अनुसरून कोणत्या गटाचे वर्तन आहे. तसेच आमदार, खासदार व पक्षाचे सदस्य कोणत्या गटाकडे जास्त आहेत, हे तपासून त्याची मालकी संबंधित गटाकडे बहाल करते, असे प्रतिपादन अॅड. अरविंद आव्हाड यांनी केले.
शिवाजीनगर व जिल्हा सत्र न्यायालयातील अशोका हॉल येथे पुणे बार असोसिएशनमार्फत व्याख्यानपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सुप्रीम कोर्ट ऑन हिंदू लॉ अॅन्ड करंट पॉलिटिकल केसेस या विषयावर अॅड. आव्हाड बोलत होते. कार्यक्रमादरम्यान, व्यासपीठावर असोसिएशनचे अध्यक्ष केतन कोठावळे, उपाध्यक्ष जयश्री चौधरी-बिडकर, सचिव अॅड. गंधर्व कवडे, अॅड. राहुल कदम, खजिनदार अॅड. समीर बेलदरे-पाटील आदी उपस्थित होते.
देशासह राज्यातील घडत असलेल्या राजकारणातील घडामोडींसह वडिलोपार्जित संपत्तीत अनौरस संतानाचे अधिकार, मुलीचे अधिकार यावर अॅड. आव्हाड यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्यासह विश्लेषणपर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास न्यायालयातील वकीलवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.




