पिंपरी | सायकलिंग क्षेत्रातील उत्तुंग भरारीमुळे शहराचा नावलौकिक

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरी म्हणून नावारुपाला आले असले तरी क्रीडा, सांस्कृतिक, तंत्रज्ञान यांसारख्या विविध उपक्रमांतूनही शहराची वेगळी ओळख निर्माण होताना दिसत आहे.
सुरज मुंढे यांच्या सायकलिंग क्षेत्रातील उत्तुंग भरारीमुळे शहराच्या नावलौकिकात भर पडली, त्याचा सार्थ अभिमान असल्याचे मत अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी व्यक्त केले.
देशातील खडतर मानली जाणारी दर ४ वर्षांनी होणारी गेट्स ऑफ हेवन या १२०० किलोमीटर सायकल स्पर्धेत सुरज मुंढे या सायकलपटूने भाग घेऊन प्रथम क्रमांक पटकवला. त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांची भेट घेतली.
यावेळी त्यांचा अतिरिक्त आयुक्त जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी क्रीडा विभागाचे सहाय्यक आयुक्त पंकज पाटील, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, स्वीय सहाय्यक शिवाजी टिळे आदी उपस्थित होते.
थेरगाव येथील रहिवासी सुरज मुंढे यांनी सुपर रँन्डुनर सिरीज, टीम ऑफ थ्री डेक्कन क्लीफहँगर (पुणे ते गोवा रेस) पोडीएम फिनिशर, अर्कॅड सह्याद्री क्लासिक चार (पसरणी, भिलार, मेढा, व अंबेनळी) घाटांची स्पर्धा, बीआरएम १०००, पॅरिस-ब्रेस्ट-पॅरिस २०२३, व गेट्स ऑफ हेव्हन २०२४ इत्यादी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सायकलिंग इव्हेंट्स प्रथम प्रयत्नांत यशश्वीरित्या पूर्ण केले.
मुंढे यांना मॉडेक्स क्लब पॅरिस तर्फे आर ५००० हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. पॅरिस-ब्रेस्ट-पॅरिस (पी.बी.पी.) २०२३ हा जागतिक दर्जाचा एक नामांकित व खडतर मानला जाणारा १२०० किलोमीटरचा सायकल इव्हेंट ४ वर्षातून एकदा होतो.
या स्पर्धेमध्ये जगभरातून सुमारे ८ हजार स्पर्धक भाग घेतात. या स्पर्धेदरम्यान डोंगरदऱ्या, घाट, सतत चढ उतार, विषम हवामान, थंडी, ऊन, वारा, पाऊस, आहार व झोपेवर नियंत्रण इत्यादी विविध आव्हानांना सामोरे जात सुरज यांनी हा १ हजार २१९ किलोमीटरचा इव्हेंट प्रथम प्रयत्नात ९० तासांत यशस्वीरित्या पूर्ण केला.
शहरातील प्रथम जीओएच फिनिशर
नुकताच जिओएच (गेट्स ऑफ हेवन) २०२४ हा सायकलिंग इव्हेंट देखील प्रथम प्रयत्नात यशस्वीरित्या पूर्ण करत त्यांनी शहराचे नाव उंचावले.
या इव्हेंट दरम्यान दक्षिण भारतातील खडतर मानले जाणारे प्रामुख्याने येरकाड, कुन्नूर, दोडाबेट्टा-ऊटी, कलपेट्टा, ईरिट्टी, सकलेशपुर व चिकमंगलूरु असे विविध १४० किलोमीटरचे घाट त्यांनी सर केले.
सुरज यांनी हा १२०० किलोमीटरचा खडतर प्रवास प्रथम प्रयत्नांत ८९ तास व ४५ मिनिटांत यशस्वीपणे पूर्ण करत शहरातून पहिला जीओएच फिनिशर होण्याचा मान मिळवला.
मुंढे यांनी घेतलेले प्रशिक्षण, त्याचे ट्रेनर आशिष जोशींचा त्यावरचा असलेला विश्वास, पत्नी आणि कुटुंबाने त्याच्यासाठी घेतलेले कष्ट, स्वतःची मेहनत, इच्छाशक्ती, आत्मविश्वास यांच्या जोरावर विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सायकलिंग इव्हेंट्स प्रथम प्रयत्नांत यशस्वीरित्या पूर्ण केले आहे, असे त्यांनी सांगितले.





