परभणी – परभणी हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. पोलिसांच्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आले होते. शासनाकडून सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर झाली. परंतु, कुटुंबीयांनी ही मदत घेण्यास नकार दिला. तसेच सोमनाथला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत शासकीय मदत स्वीकारणार नसल्याची भूमिका घेतली आहे. परभणी शहरात 10 डिसेंबर 2024 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापुढील संविधानाची विटंबना करण्यात आली होती. या घटनेचे शहरात तीव्र पडसाद उमटले होते. दुसऱ्या दिवशी आंदोलकांनी वाहनांची प्रचंड तोडफोड केली होती. सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबीयांना शासनाकडून 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती. तलाठी आणि मंडळ अधिकारी 10 लाखांच्या मदतीचा चेक घेऊन सूर्यवंशी कुटुंबीयांच्या घरी गेले होते. मात्र, सोमनाथच्या कुटुंबीयांनी ही मदत घेण्यास नकार दिला. माझ्या मुलाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत मदत घेणार नसल्याची भूमिका सोमनाथच्या आईने घेतली आहे. तसेच सोमनाथच्या मृत्यूला जबाबदार पोलिसांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मदत स्वीकारणार नसल्याचे सोमनाथच्या भावाने स्पष्ट केले आहे.