पिंपरी | खड्ड्यांवरुन मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना सुनावले खडेबोल

पिंपरी, (प्रतिनिधी) – शहरातील पुरग्रस्थांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच पिंपरी-चिंचवडचा दौरा केला. शहरात येत असताना त्यांना रस्त्यातील खड्ड्यांचा सामना करावा लागल्याने महापालिका प्रशासनाचे पितळ उघडे पडले. त्यातच खड्ड्यांमुळे झालेल्या वाहतूक कोंडीत अडकल्याने मुख्यमंत्री यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना चांगलेच खडेबोल सुनावले.
खड्ड्यांवर लक्ष देवून ते तात्काळ बुजविण्यात यावेत, असे आदेश त्यांनी तत्क्षणी दिले. त्यामुळे आयुक्त सिंह यांनी मंगळवारी (दि. ६) विभागप्रमुखांची बैठक घेऊन खालच्या अधिका-यांवर चांगलीच भडास काढली. शहरातील खड्डे त्वरीत बुजवून अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी अधिका-यांना दिले.
महापालिकेकडून दर वर्षी पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजविल्याचे दावे केले जातात. प्रत्यक्षात थोडा पाऊस झाला, की रस्त्याची चाळण होण्यास सुरुवात होते. रस्ते खोदाईस १५ मेनंतर परवानगी दिली जात नसल्याचे सांगितले जाते.
मात्र, अत्यावश्यक कामांच्या नावाखाली पावसाळ्यात बिनधास्तपणे खोदाई सुरू असते. सध्या तर महापालिकेच्या मुख्यालयासमोरच खोदाई सुरू आहे. अगोदर खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त असताना त्यात खोदाईमुळे अरुंद झालेल्या रस्त्यांची भर पडते. परिणामी, गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागांत सातत्याने प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.
शहरातील रस्त्यांवर दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडतात. शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांसह उपनगरांमधील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, चिखली, निगडी, भोसरी,
चऱ्होली, तळवडे, ताथवडे, वाकड, सांगवी यांसह शहराच्या वेगवेगळ्या भागातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. हिंजवडी आयटी नगरीतील रस्त्यांवरही खड्डेच खड्डे आहेत. वाकडमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरदेखील खड्डे आहेत.
हे खड्डे खुद्द मुख्यमंत्र्यांच्या नजरेतून सुटले नसल्याने महापालिकेचे पितळ उघडे पडले असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांची चांगलीच झाडाझडती घेऊन खड्ड्यांबाबत जाब विचारला. त्यावर उत्तरे देता देता आयुक्तांना नाकी नऊ आल्याचे अधिका-यांनी सांगितले.
आयुक्तांची झाली पंचाईत
महापालिकेत आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवारी साप्ताहीक स्थायी समिती सभा पार पडली. या सभेत खड्ड्यांचा मुद्दा उपस्थित करत आयुक्तांनी खालच्या अधिका-यांवर चांगलीच भडास काढली.
खुद्द मुख्यमंत्र्यांनी जाब विचारल्याने खुलासा करताना आयुक्तांची चांगलीच पंचाईत झाली. त्यामुळे आयुक्तांनी स्थापत्य विभागाबरोबरच क्षेत्रीय अधिका-यांना शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे तातडीने बुजवून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.





