Satara | समाजासमोर स्त्रियांच्या सुरक्षेचे आव्हान

सातारा (प्रतिनिधी) – स्त्रियांच्या सुरक्षेचे मोठे आव्हान समाजासमोर उभे आहे. ते पेलण्यासाठी मुलींशी सन्मानाने वागविण्याचा संस्कार पालकांनी आपल्या मुलांवर करण्याची गरज आहे, असे मत सातारा जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी व्यक्त केले.
संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने सातारा शहरातील सुमारे तीस शाळा महाविद्यालयांतील दहावी व बारावीच्या परीक्षेत विशेष गुणवत्ता मिळवून उज्वल यश संपादन केलेल्या प्रत्येक शाळेतील एससी, एसटी, ओबीसी,
व्हीजेएनटी, एसबीसी व खुल्या प्रवर्गातील शंभर पेक्षा अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार वैशाली राजमाने व सामाजिक वनीकरणाचे सातारा विभागीय वन अधिकारी हरिश्चंद्र वाघमोडे यांच्या हस्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची विज्ञान विषयक पुस्तके व भारतीय संविधान प्रास्ताविकेचे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनकर झिंब्रे होते. विचारमंचावर उपाध्यक्ष रमेश इंजे, कोषाध्यक्ष केशवराव कदम, विश्वस्त प्रा. प्रशांत साळवे , डॉ. सुवर्णा यादव व प्रमुख पाहुणे हरिश्चंद्र वाघमोडे उपस्थित होते.
वैशाली राजमाने म्हणाल्या, मुलींनीआयुष्याचा सामना करण्यासाठी सजग व आत्मविश्वासाने उभे राहण्याची गरज आहे. शिक्षणाने सामर्थ्य येते . उच्च ध्येय साध्य करण्यासाठी तेजस्विता तपश्विता व तत्परता या त्रिसूत्रीने पूर्ण क्षमतेने पाठपुरावा केल्यास यश अवघड नाही.
हरिश्चंद्र वाघमोडे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला चांगले संविधान दिले आहे. त्याला अभिप्रेत समाज घडविण्याची गरज आहे.
भारताचे भवितव्य तरुणांच्या हातात आहे. विद्यार्थ्यांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रेरणादायी प्रवास करून गरुड झेप घेण्याची गरज आहे. वेळीच ध्येय निश्चित करणे, समर्पण, शिस्त व एकनिष्ठता याद्वारे ध्येयावर लक्ष केंद्रित केल्यास हे सहज साध्य आहे.
दिनकर झिंब्रे म्हणाले, सामाजिक ऐक्य, बंधुभाव व राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याची गरज आहे. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सारख्या महापुरुषांनी जातीअंताचे स्वप्न पाहिले , हे विसरता कामा नये.
मी आपल्या जातीची, धर्माची अस्मिता बाळगणार नाही. तसेच कोणत्याही जातीय व धर्मांध संस्था, संघटनांचा सभासद होणार नाही अशी शपथ घेण्याचे आवाहन तरुणांना दिनकर झिंब्रे यांनी यावेळी केले.
विद्यार्थ्यांच्या वतीने वसुंधरा गिरीश म्हस्के हीने अप्रतिम मनोगत व्यक्त केले. प्रारंभी भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे समुदायिक वाचन करण्यात आले. प्रस्ताविक रमेश इंजे यांनी केले.
सूत्रसंचालन प्रा. प्रशांत साळवे यांनी केले.केशवराव कदम यांनी आभार मानले. यशपाल बनसोडे,उषा महिपती भोसले, विनोद यादव, लेखक जयवंत भिसे, सामाजिक कार्यकर्ते गणेश कारंडे यांच्यासह पालक, विद्यार्थीं प्रचंड संख्येने उपस्थित होते.


