बुलढाण्यातील केस गळतीचं कारण उघड

बुलढाणा – जिल्ह्यातील शेगाव आणि नांदुरा तालुक्यातील लोकांची झालेली केस गळती ही वातावरणातील एखाद्या विषारी घटकामुळे झाली असल्याची शक्यता आयसीएमआरच्या पथकाने व्यक्त केली. केस गळतीसंबंधी 50 रुग्णांचा अभ्यास करून 250 सँपल घेऊन आयसीएमआरचे पथक रवाना झाले आहे. विविध प्रयोगशाळेत तपासण्या करून एक महिन्यात या केस गळतीच्या कारणांचा शोध लागेल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव आणि नांदुरा तालुक्यातील अनेक गावात अचानक केस गळती सुरू झाली. त्यानंतर अनेकांना टक्कल पडण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत जवळपास 188 रुग्ण या आजाराने ग्रस्त आहेत. गेले 20 दिवस यंत्रणेने प्रयत्न करूनही अद्याप ठोस असा केस गळतीच्या कारणांचा शोध लागला नाही. त्यामुळे देशाची सर्वोच्च असलेली भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) शास्त्रज्ञांच्या आठ जणांच्या पथकांनी गेल्या चार दिवस या भागात राहून संपूर्ण रुग्णांचा अभ्यास केला.
एकूण 50 रुग्णांचा अभ्यास केल्यानंतर 250 प्रकारचे संपल्स घेऊन संशोधकांचे हे पथक रवाना झाले. या संशोधकांनी शेगाव तालुक्यातील अनेक गावांना भेट देऊन रुग्णांचा अभ्यास केला. गेले चार दिवस शेगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन या पथकाने 50 रुग्णांच्या सखोल तपासण्या केल्या . या परिसरात गुरुवारी या पथकाचा शेवटचा दिवस होता. अनेक रुग्णांच्या तपासण्या केल्यानंतर या पथकातील ज्येष्ठ सदस्यांनी आणि पथक प्रमुखांनी एका वृत्तवाहिनीने साधला.
वातावरणातील कुठल्या तरी विषारी घटकामुळे ही केस गळती होत असल्याचा प्राथमिक अंदाज या पथकाने लावला आहे. मात्र अंतिम निदान हे देशातील विविध प्रयोगशाळेत या सॅम्पलचा अभ्यास केल्यानंतर होईल अशी माहिती या पथकाने दिली आहे.





