Amol Mitkari : निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्याप्रकरणी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाकडून आकाशवाणी आमदार निवासमधील कॅन्टीनवर मोठी कारवाई करण्यात आली होती. कॅन्टीनचा परवाना रद्द केला होता. आता ते कॅन्टीन पुन्हा सुरू करण्यात आले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी आक्रमक भूमिका घेत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमध्ये मिळणाऱ्या जेवणावरून मोठा राडा घातला होता. यानंतर कॅन्टीमधील खराब जेवण आणि स्वच्छेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. कॅन्टीनचा परवाना देखील रद्द करण्यात आला होता. चार दिवसांनंतर बंद असलेले कॅन्टीन पुन्हा सुरू केल्याने मिटकरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हे कॅन्टीन चालवण्याची परवानगी अजंता केटरर्सला विधिमंडळाकडून मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या कॅन्टीनला परवानगी कशी दिली? असा सवाल आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. शिवाय आपण सर्व लोक मराठी माणसांबद्दल एवढं प्रेम दाखवत असतो. त्यामुळे या कॅन्टीनचं कंत्राट मराठी माणसाला किंवा बचत गटाला मिळावं, अशी मागणी त्यांनी केली आहे. काय म्हणाले मिटकरी? “आमदार निवासातील कॅन्टीनची अवस्था पाहिली तर त्याला पुन्हा परवानगी दिली कशी हाच मोठा प्रश्न आहे. आपण मराठी माणसाबद्दल एवढं प्रेम दाखवत असतो. पण हेच कॅन्टीनचं कंत्राट मराठी माणसाला किंवा बचत गटाला मिळावी अशी माझी भूमिका होती. मुळात माझा कंत्राट देण्याला विरोध आहे. आकाशवाणी किंवा आमदार निवासातील कॅन्टीमध्ये ज्या पद्धतीने बाहेरच्या लोकांना कंत्राट दिलं जात आणि ते लोक कसे वागतात याबाबत एक शोध मोहीमंच राबवली पाहिजे”. हे कॅन्टीन पुन्हा सुरू केल्यानंतर मिटकरी यांनी परिप्रांतीयांना कंत्राट देण्यावरून नाराजी व्यक्त केली आहे. राज्यमंत्र्यांची माहिती विधिमंडळात राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीन पुन्हा सुरू का केले याबाबत माहिती दिली. सध्या अधिवेशन सुरू असल्याने अनेक लोक येतात त्यांच्या जेवणाची सोय व्हावी यासाठी कॅन्टीन सुरु ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामुळे कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. हेही वाचा : सेन्सेक्समध्ये १८७ अंकांची वाढ ; निफ्टी ६५ अंकांच्या वाढीसह २५१३८ वर उघडला