पुणे | केळकरांच्या समाधीस्थळाचा होतोय गोठा
पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – ओंकारेश्वर मंदिरामागे भिंतीजवळ नदीपात्रात कै. गंगाधर केळकर यांची समाधी आहे. ती वास्तू उभारणीचा अप्रतिम नमुना आहे. पण, आता समाधीजवळ गुरे बांधून गोठ्यासारखा वापर सुरू आहे. तर, समाधीस्थळाचे मूळ रूप आणि भावना बदलू नयेत, असे आवाहन केळकर कुटुंबीयांनी पुणेकरांसह आणि महापालिकेला केले आहे.
याआधीही या समाधीस्थळाला शिवमंदिराचे स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला होता. याच्यासमोर दगडी नंदी आणून ठेवण्यात आला होता आणि अभिषेक वगैरे प्रकारही सुरू होते.
स्थानिक परिसरातील काही जण समाधीच्या शेडमध्ये गुरे बांधून त्यांच्या चारा-पाण्याच्या सोयीसह वापर करून समाधी परिसराचा गोठा करीत असल्याचे केळकर कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. हे पाहून गंगाधर केळकर यांचे नातू नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. श्रीकांत केळकर आणि कुटुंबीयांनी या समाधीची पाहणी केली.
या परिसराचा गोठ्यासारखा वापर करणाऱ्यांवर महापालिकेने संकारवाई केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. अनेकदा संरक्षित करून, रेलिंग आणि कठडे उभारूनही हे प्रकार थांबत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
समाधी वास्तू उभारणीचा अप्रतिम नमुना असलेली ही रचना केळकर संग्रहालयाचे संस्थापक दिनकर केळकर आणि त्यांचे बंधू भास्कर केळकर यांच्या कलाप्रेमाचा नमुनाही आहे. गंगाधर या शब्दाचा अर्थ शंकर असा असल्याने उभारणीच्या वेळेसच समाधीवर कलात्मकरीत्या पिंड (शिवलिंग) बसवलेले आहे. पानशेतच्या पुरातून वाचलेली समाधी अजून येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेते. समाधीच्या मूळ स्वरूपाची जुनी छायाचित्रेही केळकर कुटुंबीयांकडे आहेत. समाधीचा वारसा जपण्याचे आवाहन त्यांनी नागरिक आणि पुणे पालिकेला केले आहे .
कै. गंगाधर केळकर हे राजा दिनकर केळकर संग्रहालयाचे संस्थापक दिनकर केळकर यांचे पिता होते. ते अत्यंत समाजहितदक्ष होते. त्यांनी पोस्टात नोकरी केली. निवृत्तीनंतर ते पुण्यात आले. आता जेथे केळकर वस्तुसंग्रहालय आहे, ती जागा तेव्हा त्यांनी विकत घेतली. तेथे आधी आमचे घर होते, नंतर दिनकर केळकर (कवी अज्ञातवासी) यांनी संग्रहालय उभारले.
त्याआधी गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण व्हावे यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. आपल्या संपत्तीतला काही भाग विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च व्हावा, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती. आमच्याकडे अनेक विद्यार्थी राहायला असत. माझ्या काकांच्या काव्यसंग्रहाला भा. रा. तांबेंनी प्रस्तावना दिली आहे. आज त्यांच्या समाधीस्थळी अतिक्रमण होणे, हे चुकीचे वाटते. – डॉ. श्रीकांत केळकर




