बांधकाम परवाना विभाग उद्दिष्टापेक्षांही पुढे

पिंपरी -पिंपरी-चिंचवड शहर हे औद्योगिकनगरी म्हणून ओळखले जाते. शहरातील लोकसंख्या वाढीचा दर आशिया खंडात सर्वाधिक असून या शहरात वास्तव्य करण्यास नागरिकांची मोठी पसंती आहे. त्यामुळेच शहराच्या विविध भागात मोठ-मोठ्या टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. याचा थेट फायदा महापालिकेला होत असून 2021-22 या आर्थिक वर्षांत 1 मार्चअखेर बांधकाम परवाना विभागातून तब्बल 902 कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात 600 कोटींचे उत्पन्नाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. बांधकाम परवाना विभाग उद्दिष्टाच्याही पुढे गेल्याने पालिकेला काहीसा आधार मिळाला आहे.
रावेत, वाकड, ताथवडे, पुनावळे, चऱ्होली, मोशी या विकसित होणाऱ्या भागात सर्वाधिक बांधकाम परवानग्यांची नोंद झाली आहे. शहर परिसरात हिंजवडी, तळवडे आयटी पार्क आहे. करोनाचा कालावधी असतानाही शहरात अनेकांच्या हाताला काम मिळत आहे. त्यामुळे शहरात राहण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. शहरातील विविध भागांमध्ये नवनवे आणि मोठ-मोठे गृहप्रकल्प सुरू झाले आहेत. हक्काचे घर आणि गुंतवणूक अशा दुहेरी उद्देशाने नागरिकांकडून घर खरेदी केली जात आहेत. रावेत, पुनावळे, ताथवडे, वाकड, चऱ्होली, मोशी या भागात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प झाले आहेत. शहर सर्व दिशांना विस्तारत असून, सर्वत्र मोठे गृहप्रकल्प उभे राहताना दिसत आहे. त्यामुळे महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या उत्पन्नात दरवर्षी मोठ्या प्रमाणात
भर पडत आहे.
करोनामुळे पालिकेच्या एकूण उत्पन्नावर परिणाम
शहरात 5 लाख 68 हजार मिळकतींची नोंद आहे. करोनाच्या जागतिक महामारीमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळे 2022-23 चे अंदाजपत्रक 627 कोटींने कमी झाले असून याचा विकासकामांवर निश्चित परिणाम होणार आहे. एकीकडे महापालिकेचे एकूण उत्पन्न कमी होत असताना मात्र बांधकाम परवाना विभागाकडून पालिकेच्या तिजोरीत अतिरिक्त रक्कम जमा होत असल्याने पालिका प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे. बांधकाम परवाना विभागाला 2021-22 या आर्थिक वर्षात 600 कोटींचे उत्पन्नाचे उदिष्ट देण्यात आले होते. मात्र, या विभागामार्फत 1 मार्चअखेर 902 कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
बांधकाम परवानगी घेणे सोपे व्हावे, यासाठी महापालिकेची ऑनलाइन प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे बांधकाम परवानगीची प्रक्रिया जलद गतीने होते. महापालिका शहरात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा पुरवत आहे. त्यामुळे विकसक शहरात गुंतवणूक करीत आहेत. प्रशस्त रस्ते, मुबलक पाणी, सुशोभीकरण, स्वच्छ पर्यावरण यामुळे शहरात राहण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. शहराच्या सर्वच भागात गृहप्रकल्पांची संख्या वाढत असल्याने महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या उत्पन्नात दरवर्षी भर पडत आहे. आतापर्यंत 902 कोटींचे उत्पन्न मिळाले असताना 31 मार्चअखेर यामध्ये आणखी वाढ होणार आहे.
– मकरंद निकम, सह शहर अभियंता, बांधकाम विभाग





