nagar | तुकडे करुन मृतदेह गोणीत भरून फेकून दिला

नेवासा, (प्रतिनिधी) – देडगाव (ता.नेवासा) येथील पाथर्डी रस्त्यावर असणाऱ्या पाटाच्या पाण्यात पुरुषाचे तुकडे करून मृतदेह एका गोणीत भरून फेकून दिल्याची खळबळजनक घटना गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली. देडगाव परिसरात या घटनेने मोठी खळबळ उडाली.
याबाबत देडगाव येथील पाथर्डी रस्त्याकडे जाणाऱ्या मुळा धरणाच्या पाटात एक मानवी पायाचा मासांचा तुकडा तरंगत असल्याची खबर देडगावचे सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी पोलीस पाटील प्रल्हाद यशवंत ससाणे यांना गुरुवारी (दि.१६) दुपारी तीन वाजेच्या दरम्यान दिली. पोलीस पाटील ससाणे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
पाटाच्या पाण्यात तरंगत असलेल्या मानव जातीच्या तुकड्याची पाहणी करून पोलीस पाटील ससाणे यांनी त्वरित नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना घटनेची माहिती दिली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ आणि पो.ना.किरण पवार, पोलीस पाटील ससाणे यांनी पाटाच्या पाण्यात पाहणी केल्यानंतर पुढे पूर्व दिशेला पाटात एक हाताचा कोपऱ्यापासून तुटलेला व कुजलेला मांसांचा तुकडा मिळून आला. पोलिसांनी दोन पंचासमक्ष याघटनेचा पंचनामा केला. पोलिसांनी घटनास्थळी मिळून आलेले मानवी शरीराचे व कुजलेले मांसांचे तुकडे हे शवविच्छेदन करण्यासाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
अनोळखी पुरुषाचा खून करून त्याच्या शरीराची विल्हेवाट लावण्याकामी व पुरावा नष्ट करणे कामी त्या अनोळखी इसमाच्या शरीराचे तुकडे केले. ते गोणीत टाकून पाटाच्या पाण्यात देडगावच्या हद्दीतील पाथर्डीकडे जाणाऱ्या मुळा धरणाच्या पाटात फेकून देऊन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पोलिसांना मिळून आल्यामुळे पोलीस पाटील ससाणे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलीस निरीक्षक जाधव यांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.





