नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये भारतातील 500 आणि 1 हजार रुपयाच्या नोटा रद्द केल्या होत्या. या नोटा बाद करण्यामागे देशातील काळा पैसा बाहेर काढणे वगैरे कारणे दिली गेली आणि जुन्या नोटा बदलण्यासाठी संपूर्ण देश रांगेत उभा होता.
मात्र, याच जुन्या नोटा मिळवण्यासाठी कोणी नव्या 14 लाख रुपयांच्या नोटा मोजून देत असेल तर त्याचे कारण काय असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. तोच प्रश्न दिल्ली पोलिसांना पडला असून त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
दिल्लीतील एका व्यक्तीकडे जुन्या बाद झालेल्या नोटा असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी संबंधित व्यक्तीच्या घरावर छापा घातला असता जुन्या नोटांची बंडले त्यांना आढळून आली. 500 आणि हजार रुपयाच्या नोटा होत्या. त्या आपण नव्या 14 लाख रुपये देऊन खरेदी केल्या असल्याचे त्याने सांगितले.
त्याचे पुढे आपल्याला 20 लाख रुपये मिळणार होते असेही या इसमाने तपासात सांगितल्याचे माहिती समोर येते आहे. मात्र, जुन्या नोटांचा असा कोणता काळाबाजार सुरू आहे, त्या कोण घेतो आहे, कोणाच्या सांगण्यावरून हा प्रकार सुरू आहे हे सगळे बुचकळ्यात टाकणारे प्रश्न पोलिसांसमोर आले असून आता त्याचा तपास केला जातो आहे.