पुणे | पोलिसाला फरफटत नेऊन दुचाकीस्वार झाला पसार

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – लष्कर भागात विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराने वाहतूक नियमन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला धडक दिली. याशिवाय विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराने रोखणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास फरफटत नेले आणि तो पसार झाला.
याप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध लष्कर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस नाईक दादासाहेब कर्चे यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कर्चे लष्कर वाहतूक विभागात नियुक्तीस आहेत. रविवारी (१४ जुलै) दुपारी चारच्या सुमारास कर्चे लष्कर भागातील महावीर चौकात वाहतूक नियमन करत होते.
त्या वेळी दुचाकीस्वार विरुद्ध दिशेने महावीर चौकाकडे येत होता. वाहतूक नियमन करणाऱ्या कर्चे यांनी दुचाकीस्वाराला थांबण्यास सांगितले. दुचाकीस्वाराने कर्चे यांच्या अंगावर दुचाकी घातली.
कर्चे यांनी दुचाकीस्वाराला रोखण्याचा प्रयत्न केला. कर्चे यांना फरफटत नेऊन दुचाकीस्वार पसार झाला. कर्चे यांच्या पायाला दुखापत झाली असून, पसार झालेल्या दुचाकीस्वाराचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.




