Share Market Scams : शेअर मार्केटमधील सर्वात मोठे घोटाळे, ज्याने देश हदरला होता

Biggest Share Market Scams : शेअर मार्केटमध्ये पुन्हा एकदा केतन पारेखच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. 2001 च्या काळात चर्चेत आलेला कुविख्यात केतन पारेखचा एका नवीन घोटाळ्यात समावेश असल्याचे समोर आले आहे. फ्रंट-रनिंग घोटाळ्यात नाव समोर आल्यानंतर पुन्हा एकदा सेबीने मार्केटमध्ये आर्थिक व्यवहार करण्यावर त्याच्यावर बंदी घातली आहे.
मात्र, केतन पारेखवर व्यवहार करण्याची बंदी घालण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील घोटाळ्यात नाव आल्याने त्याच्यावर 14 वर्षांची बंदी घालण्यात आली होती. केतन पारेखचा हा नवीन घोटाळा काय आहे व शेअर मार्केट हदरवून सोडणारे यापूर्वी असे कोणते घोटाळे उघड झाले आहेत? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
फ्रंट रनिंग घोटाळा
फ्रंट रनिंग घोटाळ्यामध्ये केतन पारेखचे नाव समोर आले आहे. फ्रंट रनिंग ही एकप्रकारे बेकायदेशीर पद्धत आहे, ज्यात ब्रोकर अथवा ट्रेडर स्वतःच्या फायद्यासाठी क्लाइंट ऑर्डरच्याबाबतीत गोपनीय माहिती मिळवतो. फ्रंट रनिंगला मार्केटमधील हेरफेर आणि इनसाइडर ट्रेडिंगचा प्रकार मानला जातो.
समजा, X हा एक रिटेल गुंतवणुकदार आहे, जो XYZ कंपनीचे 1 हजार शेअर्स खरेदी करण्यासाठी ब्रोकरेज फर्मशी संपर्क करतो. ब्रोकरेज फर्म दुसरा ट्रेडर Y ला याची माहिती देते. X कडून ऑर्डर प्राप्त झाल्यानंतर Y ला ही ऑर्डर महत्त्वाची वाटल्यानंतर कंपनीच्या स्टॉकची किंमत वाढवली जाऊ शकते. यामुळे X ची ऑर्डर लागू करण्याऐवजी कंपनीचे स्टॉक्स खरेदी करण्यासाठी Y ची ऑर्डर आधी लागू केली जाते.
Y च्या ऑर्डरमुळे शेअरची मागणी वाढते व यामुळे शेअर्सच्या किंमतीत देखील वाढ होते. अशावेळी Y वाढलेल्या किंमतीत शेअर्सची विक्री करून नफा कमवतो. Y ला नफा झाल्यानंतरच X ची ऑर्डर लागू केली जाते. याच प्रक्रियेला फ्रंट रनिंग घोटाळा म्हटले जाते. पारेख याच इनसाइडर ट्रेडिंगच्या माध्यमातून वेगवेगळ्या अकाउंटवरून ट्रेड पूर्ण करून नफा कमवत असे. घोटाळा समोर आल्यानंतर सेबीने यातून कमवलेला 65.77 कोटी रुपयांचा बेकायदेशीर नफा जप्त केला आहे.
हर्षद मेहताचा घोटाळा
जेव्हा जेव्हा शेअर मार्केट घोटाळ्याची चर्चा होते, त्यावेळी हर्षद मेहताचे नाव सर्वात आधी समोर येते. 90च्या दशकात या घोटाळ्यामुळे भारतीय शेअर मार्केट हदरले होते. हा घोटाळा त्यावेळी जवळपास 4 हजार कोटी रुपयांचा असल्याचे समोर आले होते.
हर्षद मेहताचा जन्म 29 जुलै 1954 ला राजकोट, गुजरात येथे झाला होता. त्यानंतर तो पुढे मुंबईत आला. त्याने सर्वातआधी न्यू इंडिया अश्योरेंस कंपनी लिमिटेडमध्ये सेल्सपर्सन म्हणून पहिली नोकरी केली. पुढे हरिजीवनदास नेमीदास सिक्योरिटीज ब्रोकरेज फर्ममध्ये काम करू लागला. काही दिवसांनी ही नोकरी देखील सोडून त्याने स्वतःची ग्रो मोर रिसर्च अँड अॅसेट मॅनेजमेंट नावाची कंपनी सुरू केली.
हर्षद ज्या शेअर्सची खरेदी करेल, त्या शेअर्सची किंमत वाढणारच, अशी धारणा त्यावेळी प्रचलित झाली होती. मात्र, बँकांच्या नियमांची मोडतोड करत त्याने फायदा उचलण्यास सुरुवात केली होती. मेहता दोन बँकांमध्ये मध्यस्थ म्हणून काम करत असे. तो बँकांकडून 15 दिवसांचे कर्ज घ्यायचा व तेच पैसे मार्केटमध्ये लावायचा. अशाप्रकारे, नफा कमावल्यानंतर पैसे बँकांना परत करायचा. यासाठी तो बनावट बँक रिकॉन्सिलिएशन स्टेटमेंट देखील बनवत असे. मात्र, ही बाब उघड झाल्यानंतर मार्केट प्रचंड घसरले. पुढे त्याच्यावर गुन्हे देखील झाले.
केतन पारेख (2001)
सध्या फ्रंट-रनिंग घोटाळ्यामुळे केतन पारेख चर्चेत आहे. मात्र, याआधी देखील जवळपास 40 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यात त्याचे नाव समोर आले आहे. हर्षद मेहताचा घोटाळा उघड झाल्यानंतर सेबीने कठोर नियमावली तयारी केली होती. मात्र, तरीही केतन पारेख घोटाळा करण्यात यशस्वी झाला.
त्याने घोटाळ्यासाठी पंप आणि डंप या पद्धतीचा वापर केला. यामध्ये कमी किंमतीचे शेअर्स निवडून त्याच्यात गुंतवणूक केली जाते. आधी शेअर्सच्या किंमती फुगवल्या व त्यानंतर स्वतः नफा कमवल्यावर हेच शेअर्स विकून गुंतवणुकदार त्यातून बाहेर पडतो. यासाठी तो इनसाइडर ट्रेडिंगचा देखील वापर करत असे. मात्र, हा घोटाळा उघड झाल्यानंतर शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यावर त्याच्यावर बंदी घालण्यात आली.
पॉन्झी स्कीम घोटाळा (1920)
तुम्ही अनेकदा पॉन्झी स्कीमच्या माध्यमातून घोटाळा झाला असे वाचले अथवा ऐकले असेल. मात्र, अशाप्रकारच्या घोटाळ्याची पहिल्यांदा सुरुवात 1920 मध्ये झाली. पॉन्झीचा थोडक्यात अर्थ, गुंतवणुकादारांना कमी रक्कमेत जास्तीत जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवणे. एकदा का गुंतवणुकादारांनी पैसे जमा केले, त्यानंतर मात्र त्यांना कोणताही परतावा मिळत नाही.
विशेष म्हणजे या घोटाळ्याला एका खऱ्या व्यक्तीच्या नावावरूनच नाव पडले आहे. चार्ल्स पॉन्झी नावाच्या व्यक्तीने 1920 च्या काळात आंतरराष्ट्रीय रिप्लाय कूपन्समध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली अनेकांना फसवले होते. त्याच्या नावावरूनच पुढे अशाप्रकारच्या घोटाळ्यांना पॉन्झी नावाने ओळखले जाऊ लागले.
2008 साली देखील असाच एक मॅडॉफ गुंतवणूक घोटाळा समोर आला होता. या घोटाळ्यात बर्नी मॅडॉफ नावाच्या व्यक्तीने उच्च परतावा देण्याच्या नावाखाली लोकांकडून पैसे घेतले. मात्र, याच पैशांचा वापर तो आधीच घेतलेले पैसे फेडण्यासाठी करत असे.
सत्यम कॉम्प्युटर्स घोटाळा
भारतातील सर्वात मोठ्या घोटाळ्यांच्या यादीत सत्यम कॉम्प्युटर्सचे देखील नाव जोडले जाते. रामालिंगा राजू यांनी 1987 मध्ये सत्यम कॉम्प्युटर कंपनीची स्थापना केली होती. 1992 मध्ये कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्टेड झाली. सुरुवातीला कंपनीत फक्त 20 कर्मचारी होते. मात्र, नंतर हा आकडा 53 हजारांवर पोहोचला.
या कंपनीने बाजारात प्रचंड वेगाने प्रगती केली. कंपनीचे मार्केट कॅप देखील प्रचंड वाढले होते. रामालिंगा राजू यांना त्यांच्या कामासाठी अनेक पुरस्कारही मिळाले होते. मात्र, नंतर कंपनीच्या आर्थिक व्यवहारात गडबड असल्याचे समोर आले. स्वतः रामालिंगा राजू यांनी ही बाब मान्य केली.
कंपनीच्या खात्यात मोठी हेरफेर करण्यात आली होती. तसेच, नफा वाढून दाखवण्यात आला होता. कंपनीत 40 हजारच कर्मचारी होते. मात्र, हा आकडा 53 हजार दाखवण्यात आला होता. उर्वरित 13 हजार कर्मचाऱ्यांच्या नावाखाली राजू स्वतः दरमहिन्याला 20 हजार कोटी रुपये काढून घेत असे. याशिवाय, गुंतवणुकदारांचे पैसे मुलाच्या नावावर असलेल्या मायता इंफ्रा आणि मायता प्रॉपर्टीजमध्ये वळवण्यात आले होते. या घोटाळ्यात जवळपास 6 कोटी गुंतवणुकदारांची 7800 कोटी रुपयांना फसवणूक झाली.

