सर्वांत मोठा बॅंक घोटाळा ! आरोपींविरोधात सीबीआयच्या लुक आऊट नोटिसा

नवी दिल्ली, -देशातील सर्वांत मोठा बॅंक घोटाळा करणाऱ्या नऊ आरोपींविरोधात सीबीआयने लुक आऊट नोटिसा जारी केल्या आहेत. आरोपींना देशाबाहेर पलायन करण्यापासून रोखण्यासाठी ते पाऊल उचलण्यात आले आहे.
प्रामुख्याने गुजरातमध्ये कार्यरत असणाऱ्या एबीजी शिपयार्ड कंपनीने विविध बॅंकांना तब्बल 22 हजार 842 कोटी रूपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. देशातील त्या सर्वांत मोठ्या बॅंक घोटाळ्यावरून सीबीआयने नुकताच संबंधित कंपनी आणि कंपनीचे माजी अध्यक्ष ऋषी कमलेश आगरवाल तसेच कंपनीच्या तत्कालीन संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला.
त्या आरोपींच्या नेमक्या ठावठिकाण्याविषयीची माहिती पुढे आलेली नाही. मात्र, ते देशातच असल्याचे सीबीआयकडून सूचित करण्यात आले आहे. एबीजी शिपयार्ड कंपनीने विविध बॅंकांकडून कर्ज घेतले. मात्र, ते बुडित ठरले आहे. संबंधित प्रकरणात बॅंकांकडून मिळालेल्या रकमांचा वापर नियमबाह्यपणे झाल्याचे समोर आले आहे.
त्या घोटाळ्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. सीबीआय कारवाईच्या विलंबावरून कॉंग्रेसने मोदी सरकारला घेरण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. तर, कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीएच्या राजवटीतच ते कर्ज बुडित ठरल्याचा प्रतिदावा सरकारकडून केला जात आहे.





