पुणे | कलाम यांच्या नावाचा पुरस्कार संस्मरणीय

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाचा पुरस्कार सूर्यदत्त संस्थेला मिळाला, ही बाब संस्मरणीय आहे. कलाम यांच्या उल्लेखनीय कार्याला अभिवादन म्हणून त्यांचे नाव संस्थेतील एका सभागृहास दिले आहे, असे सूर्यदत्तचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी सांगितले.
स्वानंद महिला संस्था, अखिल भारतीय जैन कॉन्फरन्स महिला शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंधराव्या अखिल भारतीय स्त्री साहित्य कला संमेलनात सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनला ‘राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम क्रियाशील गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यात ज्येष्ठ साहित्यिक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
ज्येष्ठ साहित्यिका नीलम माणगावे यांच्या अध्यक्षतेखाली निगडी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहामध्ये स्त्री साहित्य कला संमेलनाचे उद्घाटन झाले. स्वागताध्यक्ष आशा लुंकड, स्वानंदच्या संस्थापिका प्रा. सुरेखा कटारिया, अध्यक्षा शोभा बंब आदी उपस्थित होते.
संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध उद्योजक प्रकाश धारीवाल, उद्योजक नेमीचंद चोपडा, उद्योजिका दिना धारीवाल, उद्योजिका आशा कटारिया, जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय पदाधिकारी प्रा. अशोक पगारिया, रमणलालजी लुंकड, अविनाशजी चोरडिया, भाऊसाहेब भोईर, प्रफुल्ल रायसोनी, राजेंद्र सोनावणे आदी उपस्थित होते.




