– विनय गुरव
भुलेश्वर – पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील भुलेश्वर डोंगराच्या पायथ्याला भुलेश्वर वनउद्यान व डोंगर रांगेत अनेक देशी व विदेशी पक्ष्यांचे आगमन झाले आहे. या ठिकाणी परदेशी पक्ष्यांचा अभ्यास करण्यासाठी व छायाचित्रणासाठी पक्षी प्रेमींची मोठी गर्दी पाहावयास मिळत आहे.
पुणे शहराच्या दक्षिणेला सह्याद्रीच्या पर्वत रांगेतून दिवे घाटापासून पूर्वेकडून निघालेली डोंगर रांग म्हणजेच भुलेश्वर डोंगर रांग. या डोंगर रांगेवर सोनोरीचा मल्हार गड, वाघापुरचे माणकेश्वर, आंबळे येथील ढवळेश्वर तर माळशिरस येथील भुलेश्वर अशी विविध ठिकाणे आहेत. ही डोंगर रांग पर्यटकांसोबत आता निसर्ग प्रेमींचे सुद्धा आकर्षण ठरू लागली आहे. कोल्हा, लांडगा, तरस, चिंकारा (हरण) असे विविध प्राणी तर मंगोलियन गरुड, ठिपक्याचा गरुड, सर्प गरुड, बोनेलीसा गरुड, अमूर ससाणा, तुरेवाला गरुड, बहिरी ससाणा, कारुण्य कोकिळा, छोटा पावश्या, खंड्या असे विविध प्राणी-पक्षी पाहावयास मिळतात.
दिवसेंदिवस होत असलेल्या पर्यावरणातील बदलामुळे त्याचबरोबर प्लॅस्टिकच्या अतिरिक्त वापरामुळे या ठिकाणी येणाऱ्या परदेशी पक्ष्यांचे प्रमाण कमी होत चालले आहे. 15 वर्षांपूर्वी जे मंगोलियन गरुड 100 ते 150च्या संख्येने या भागामध्ये येत असत. ते आता 5 ते 10च्या संख्येने येतात. पर्यावरण बदलाकडे लक्ष न दिल्यास या ठिकाणी येणारे परदेशी पक्षी कालांतराने पाहायला मिळणार नाहीत, असे मत निसर्ग मित्र व पक्षी प्रेमी विजयराज जरे यांनी व्यक्त केले.
पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जास्त पाऊस झाल्याने पावसाळ्यात दिसणारा पावसाळी लावा हे पक्षी जास्त संख्येने दिसत आहे व इतर दुर्मिळ पक्षी देखील या वर्षी दिसत आहेत. सप्टेंबर ते जानेवारी या काळामध्ये मोठ्या प्रमाणात परदेशी पक्षी दिसून येतात.
-हमीद शेख, निसर्ग मित्र, हिवरे पुरंदर