पुणे | खड्डयांचे अॅपही खड्डयात ; निधी असूनही प्रशासनाचे दूर्लक्ष

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरातील रस्ते खोदाईपासून रस्ते दुरूस्तीपर्यंत आणि खड्डे पडल्यास नागरिकांनी एका क्लीकवर खड्डयांची तक्रार करता यावी यासाठी महापालिकेकडून खड्डयांंसाठी मोबाईल अॅप्लिकेशन तयार केले जाणार होते. त्यासाठी, पुढाकार तत्कालीन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात सुमारे ४० लाख रूपयांची तरतूदही केली.
मात्र, गेल्या सहा महिन्यांत हे मोबाइल अॅप तयार करण्यासाठी पालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागास वेळ मिळालेला नाही. विशेष बाब म्हणजे हे मोबाइल अॅप कसे असावे यासाठी पिंपरी-चिंचवड पालिकेने पुणे महापालिकेकडून माहिती घेऊन स्वत:चे मोबाइल अॅप विकसित करीत ते नागरिकांच्या सेवेतही आणले. पुण्यासाठी तयार होणारे अॅप बनविण्याची योजना मात्र खड्ड्यात गली की काय, अशी चर्चा आहे.
काय होईल फायदा ?
शहरात रस्ते बांधणी, दुरुस्ती व विकास यांच्या संदर्भात सर्व माहितीसाठी संबंधित अॅप्लिकेशन असणे आवश्यक असणार आहे. सध्या पथ विभागामार्फत कोणत्याही खोदकामाची लेखी (मॅन्युअली) परवानगी दिली जाते.
खोदकाम परवानगी घेणे मॅन्युअल पद्धतीने क्लिष्ट असून त्यासाठी अधिकचा वेळ जातो त्यामुळे कामामध्ये गतिमानता व सुधारणा करणे गरजेचे आहे.
गतिमानता आणण्यासाठी व चालू कामाचे सद्यस्थिती,नागरिकांनाही खड्डयांची तक्रार करणे तसेच हे सर्व ट्रॅकींग जीपीएस प्रणालीवर करण्यात येणार आहे.
त्यामुळे एकाच जागी किती वेळा, किती कालावधीत खड्डे पडले याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध झाल्यास ठेकेदारांचे निकृष्ट कामाचे पितळही उघडे पडणार आहे.


