खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा जोरदार खडाजंगीत

खंडाळा – खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २९ रोजी झाली. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित या सभेसाठी दोन्ही गटाकडून मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यामधे ठराव मांडत असताना दोन्ही गटांकडून घोषणाबाजीही करण्यात आली.
मागील सभेचे इतिवृत्त वाचणे, २०२३/२४ सालाच्या अहवालाची नोंद घेणे, आर्थिकपत्रकांना मंजुरी देणे, हिशोब तपासणी अहवाल व २०२२/२३ च्या दोष दुरुस्ती अहवालास मंजुरी देणे, २०२४/२५ साठी तयार केलेल्या अंदाजपत्रकास व २०२३/२४ मधील अंदाजपत्रकापेक्षा कमी जास्त खर्चास मंजुरी देणे, २०२४/२५ साठी लेखापरीक्षकांची नियुक्ती करणे, ऐनवेळचे विषय या विषयांवर ही सभा आयोजित करण्यात आली होती.
सभेचे प्रास्ताविक केल्यानंतर व्हाइस चेअरमन राजेंद्र तांबे यांनी सभेचे विषय सादर केले. यावेळी खंडाळा सहकारी साखर उद्योगामध्ये विविध विषयांवर वादंगाची परिस्थिती निर्माण झाली होती. सभेच्या ठरावातील विषय मांडल्यावर अनिरुद्ध गाढवे, नितीन सावंत इत्यादींनी सत्ताधाऱ्यांच्या विषयांवर प्रश्न उपस्थित केले.
यावेळी दोन्ही गटांकडून चालू झालेल्या गोंधळात सत्ताधाऱ्यांकडून मंजूर तर विरोधकांकडून नामंजूर असे नारे सुरू झाले, यामध्ये त्रयस्थ गुंतवणूकदाराला भागीदारी देण्यास बहुतांश सभासदांचा विरोध असल्याचे दिसून आले. ९४ लाख रुपयांचा अपहार झाल्याची बाजू विरोधकांनी लावून धरताच सत्ताधारी व विरोधक कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण होत वादंग निर्माण झाला.
या सभेसाठी मकरंद पाटील, नितीन पाटील, नितीन भरगुडे पाटील, राजेंद्र तांबे, बकाजीराव पाटील, डी.एम. भोसले, एस. वाय. पवार, अशोक गाढवे, प्रमोद शिंदे, सर्व संचालक तसेच जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, अनिरुद्ध गाढवे, बंडू ढमाळ, डॉ. नितीन सावंत, युवराज गाढवे, युवराज ढमाळ, दत्तात्रय गाढवे, अजिंक्य चौधरी, बापूराव धायगुडे, धनाजी ढेरे, जितेंद्र गाढवे, अतुल पवार व मोठ्या संख्येने सभासद, सचिव सागर गाढवे तसेच पोलिस प्रशासन उपस्थित होते.
अध्यक्षांची मूक भूमिका
खंडाळा साखर कारखान्याचे अध्यक्ष व्ही. जी. पवार यांना अनिरुद्ध गाढवे यांनी एका विषयावर वारंवार स्पष्टीकरण मागितले. मात्र, शेवटपर्यंत व्ही. जी. पवार यांची भूमिका मूक राहिल्याने वादंग निर्माण झाला. मागील वर्षीच्या सभेतही व्ही.जी. पवार यांनी भाषण करताना खंडाळा कारखाना केवळ सात कर्मचाऱ्यांवर चालू शकतो असे वक्तव्य केले होते.
त्यावेळी मोठ्या प्रमाणावर हास्यकल्लोळ उडाला होता. तसेच सभेतील चालू भाषणावेळी आमदारांनी त्यांचे कानही टोचले होते. चेअरमन बोलले तरी वादंग व नाही बोलले तरी वादंग होत असल्याची परिस्थिती आहे असे विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.





