nagar | निवडणूक आयोगावरील आरोप राजकीय हेतूने प्रेरित

श्रीरामपूर,(प्रतिनिधी)- आजपर्यंत निवडणूक यंत्रणेत कधीही चूक निघाली नाही. ज्यांना चुकीचे म्हणायचे त्यांना म्हणू द्या, मात्र आयोगाचा सामान्य जनतेवर विश्वास आहे. निवडणूक आयोगावर केले जाणारे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे प्रतिपादन राज्याचे अतिरिक्त निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी केले आहे.
बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य महाविद्यालयात मतदार नोंदणी, मतदारांचे अधिकार व जबाबदार यावर स्वीप अंतर्गत युवा संवाद कार्यक्रमात विद्यार्थी युवा मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी राजेश खटोड होते. यावेळी प्रांताधिकारी किरण सावंत, तहसिलदार मिलिंद वाघ, सहायक जिल्हा माहिती अधिकारी अनिल महाजन, संस्थेचे अध्यक्ष अशोक साळुंके, नंदू खटोड, बापूसाहेब पुजारी,
भरत साळुंके, रविंद्र खटोड, शेखर डावरे, मंडल अधिकारी भिमराज मंडलिक, प्राचार्या डॉ.गुंफा कोकाटे, दत्तात्रय पुजारी, सरपंच स्वाती अमोलिक, प्रा.नामदेव मोरगे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ.कुलकर्णी म्हणाले, शहरी भागातील लोक मतदानाच्या दिवशी सुटीचा फायदा घेत बाहेर पडतात. त्यामुळे शहरी भागात मतदान कमी होते. मात्र, ग्रामीण व आदिवासी भागात मतदानाची टक्केवारी जास्त आहे.
निवडणूक आयोग मतदानाची सक्ती करीत नाही मात्र ज्यांना शासक निवडून द्यायचा त्यांना मतदानाची काळजी असली पाहिजे. युवकांमध्ये मतदार नोंदणी करण्याची टक्केवारी कमी आहे ती वाढली पाहिजे.
ईव्हीएम मशिनवर आक्षेप घेतले जातात मात्र ते खात्रीशीर आहे. जगात आपणच एव्हीएमवर मतदान करतो, ही अभिमानाची गोष्ट आहे. फेक न्यूजचे संकट मोठे असल्याचेही त्यांनी सांगितले.





