धनंजय मुंडेंनी करुणासोबत लग्न केलंच नाही, वकिलाचा युक्तिवाद; न्यायाधीश म्हणाले – ‘मग मुलं…..?

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील पोटगी वादावर २९ मार्च रोजी माझगाव सत्र न्यायालयात सुनावणी झाली. करुणा यांना दरमहा २ लाख पोटगी देण्याच्या वांद्रे न्यायालयाच्या अंतरिम आदेशाला मुंडे यांनी आव्हान दिले आहे. मुंडे यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, करुणा यांच्याशी त्यांचे अधिकृत लग्नच झाले नाही. दोन्ही मुलांना मुंडे यांनी स्वीकारले असले तरी करुणा त्यांच्या पत्नी नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, करुणा आर्थिकदृष्ट्या सक्षम असून त्यांची वार्षिक कमाई १५ लाखांजवळ आहे, असेही सांगितले.
न्यायाधीशांनी विचारले, “मुलं मुंडे यांची असतील तर करुणा त्यांची आई कशी नाहीत?” यावर मुंडे यांच्या वकिलांनी संबंध परस्पर संमतीचे होते, पण लग्न नव्हते, असे उत्तर दिले. दुसरीकडे, करुणा यांच्या वकिलांनी १९९८ मध्ये लग्न झाल्याचा दावा करत फोटो आणि पुरावे सादर करण्यासाठी वेळ मागितला. न्यायालयाने ५ एप्रिलपर्यंत पुरावे सादर करण्याचे निर्देश देत सुनावणी पुढे ढकलली. हा वाद आता कोणती वाट धरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





