खटाव (प्रतिनिधी)- तालुक्याचे गाव असलेल्या खटावमध्ये गेली काही वर्षे खंडित वीजपुरवठ्याने शेतकरी, गावकरी विद्यार्थी , अबालवृध्द मेटाकुटीला आले आहेत. अनेक वेळा निवेदने देवून, आंदोलने करुन वीजवितरणच्या कारभारात फरक पडला नाही. तत्कालीन ग्रामपंचायत आणि खटावकरांच्या रेट्यामुळे २०१७ साली मंजूर झालेल्या ३३ केव्ही सबस्टेशनचे काम मार्गी लागले तर खटावसह परिसरातील वीजपुरवठ्यातील समस्या संपणार आहेत, त्यामुळे पोवई गणेश टेकडीजवळील सबस्टेशनचे काम त्वरित सुरु करा अशी मागणी जिल्हा बॅंकेचे संचालक प्रदीप विधाते यांनी केली आहे. त्याबाबत त्यांनी अधिक्षक अभियंत्यांशी चर्चाही केली आहे. वीजवितरणच्या भोंगळ कारभारामुळे सध्या खटावची ओळख कधीतरी लाईट असणारे गाव अशी झाली आहे. दिवसातील बहुतांश कालावधी लाईट गायब होत असल्याने गृहिणी, अबालवृध्द, विद्यार्थी, व्यावसायिक, पोस्ट, बॅंका आणि शेतकऱ्यांना आतोनानात त्रास होत आहे. वीजवितरणच्या अनागोंदी कारभाराविरोधात अनेक वेळा आवाज उठवूनही वीजपुरवठा सुरळीत होत नाही. जिल्हा बॅंकेचे संचालक प्रदीप विधाते यांनी नुकतीच वीजवितरण विभागाच्या अधिक्षक अभियंत्यांशी याबाबत चर्चा केली. खटाव आणि परिसराला चौकीचा आंबा आणि शिंदेवाडी सबस्टेशनवरुन केला जाणारा वीजपुरवठा अनियमित आणि अपुऱ्या दाबाने केला जात असल्याचे विधाते यांनी निदर्शानास आणून दिले. विधाते म्हणाले, वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याने सर्वांनाच अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वीजवितरणच्या कारभारात सुधारणा झालेली नाही. शेतकऱ्यांना जीवावर उदार होवून रात्री अपरात्री लाईट असेल तेव्हा शेतीला पाणी देण्यासाठी जावे लागते. पाणी उपलब्ध असताना केवळ लाईट नसल्याने पिके करपून जाण्याच्या घटनाही अनेक वेळा घडल्या आहेत. तत्कालीन ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांच्या पाठपुराव्याने २०१७ साली खटावसाठी ३३ केव्हीचे सबस्टेशन मंजूर करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीने त्यासाठी पोवई गणेश मंदिर परिसरातील ग्रामपंचायत मालकीची जागाही दिली आहे. या सबस्टेशनचे काम मार्गी लागले तर खटाव आणि परिसराला सुरळीत आणि पुरेशा दाबाने वीजपुरवठा करता येणार आहे. त्यामुळे प्रशासनाने खटाव सबस्टेशनचे काम त्वरित सुरु करावे अशी मागणी विधाते यांनी केली आहे.