पुणे | पुणे आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – जिल्ह्यासह शहरात काल रात्रीपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीत एकूण चार जण मृत्यू पावले आहेत, तर दरड कोसळणे, पुलावरून पाणी जाणे अशा विविध घटनांमुळे दोन राज्यमार्ग आणि सात जिल्हा मार्गांवरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
शहरातील पूरस्थिती लक्षात घेऊन नागरिकांच्या मदतीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) तुकड्यांसोबत लष्कराच्या पाच तुकड्या पाचारण करून स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.
दरम्यान, हवामान विभागाने पुढील ४८ तासांत अति मुसळधार पावसाची शक्यता (रेड अलर्ट) व्यक्त केली आहे, त्यादृष्टीने निर्माण होणाऱ्या आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण केली आहे, असेही डॉ. दिवसे यांनी सांगितले.
वाहतुकीसाठी बंद केलेले मार्ग
राज्यमार्ग (१०३) खेड तालुक्यातील उरण पनवेल भोरगिरी वाडा, खेड पाबळ शिरूर रस्त्यावर दरड कोसळल्याने बंद
राज्यमार्ग (१३३) मावळ तालुक्यातील खडकवासला डोणजे खानापूर पाबे रस्ता पुलावरून पाणी वाहत असल्याने बंद
जिल्हा मार्ग : सोमाटणे शिरगाव दारुंब्रे कासारसाई पाचाणे पुसाणे ओव्हळे रस्ता पुलावरून पाणी वाहत असल्याने बंद
जिल्हा मार्ग : वडगाव कातवी वराळे माळवाडी ते राष्ट्रीय महामार्ग ५५ ला जोडणाऱ्या मार्गावरील रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने बंद
जिल्हा मार्ग : अैंढे देवळे पाटण बोरज पाथरगाव रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने बंद
जिल्हा मार्ग : कामशेत नाणे गोवित्री थोरण जांभवली कोंडेश्वर रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने बंद
जिल्हा मार्ग : एकवीरा देवी पायथा मंदिर ते कार्ला मळवली भाजे लोहगड ते जिल्हा मार्ग २६ ला जोडणारा मार्ग पर्यायी वाहतूक वळविल्याने बंद
पर्यटन स्थळे बंद
भोर, मावळ, मुळशी आणि इतर तालुक्यांमध्ये पर्यटनासाठी मोठी गर्दी होत असते. त्या अनुषंगाने प्रांत, तहसीलदार, तलाठी आणि पर्यटन विभागाच्या स्थानिक प्रशासनाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. विशेषत: पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेली पर्यटनस्थळे पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत, असेही डॉ. दिवसे यांनी सांगितले.





