पुणे | पबवर वचक ठेवण्यासाठी हालचाली…

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरातील पबवर वचक ठेवण्यासाठी आता पोलीस प्रशासन, महापालिका आणि उत्पादन शुल्क विभाग एकत्रितपणे कारवाई करणार आहेत. या तिनही विभागांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी लवकरच महापालिका आयुक्त ,
पोलीस आयुक्त आणि उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी सांगितले. पबवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात येणार आहे.
पब अथवा हॉटेलला महापालिका परवानगी देते, तर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची असते; तर पबमध्ये नियमांचे पालन होते की नाही हे पाहण्याची जबाबदारी उत्पादन शुल्क विभागाची असते.
या तिनही विभागांचे अधिकार आणि त्यांची जबाबदारी यानुसार कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, तरीही पब चालकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी सांगितले की, यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन-तीन दिवसांत बैठक घेण्यात येणार आहे.




