घातपाताला केला अपघाताचा बनाव! संतप्त नेवासकरांचा नेवासा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा!

नेवासा (प्रतिनिधी) : नेवासा शहरातील उद्योजक व खडका फाटा (ता.नेवासा) येथील जानकी खडी क्रेशरचे मालक शंतनू पोपट वाघ यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने अपघाताचा बनाव करुन एका पांढऱ्या रंगाच्या अज्ञात बोलेरो जीपने वाघ यांचा पाठलाग करत पाठीमागून मोटारसायकलला भरधाव वेगात धडक देवून गंभीर जखमी करण्याची घटना अ.नगर – छञपती संभाजीनगर महामार्गावरील नेवासा फाट्याजवळ असलेल्या त्रिमूर्ती पब्लिक स्कुलसमोर बारा दिवसांपुर्वी घडली होती.
त्यामुळे वाघ कुटूंबियांनी हा अपघात नसून घातपात असल्याचे काही महत्वाचे पुरावे पोलीसांकडे दिलेले असतानाही अद्यापपर्यंत नेवासा पोलीसांनी आरोपींचा शोध घेऊन अटक न केल्यामुळे सोमवार (दि.२६) रोजी दुपारी १२ वाजता संतप्त नेवासकरांनी नेवासा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला व आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची एकमुखी मागणी यावेळी केली.
यावेळी संतप्त नेवासा शहरातील नागरिकांनी पोलीस ठाण्यावर काढलेल्या या धडक मोर्चाप्रसंगी बोलतांना सांगितले की,खडका फाटा येथील जानकी खडी क्रेशरचे मालक शंतनू पोपट वाघ यांच्यावर काही जणांनी कट कारस्थान रचून जिवे मारण्याचा प्रयत्न शुक्रवार (दि.१६) ऑगस्ट रोजी केलेला होता. या घटनेला बारा दिवस उलटून गेले तरीही पोलीसांनी आरोपी अद्याप ताब्यात घेतलेले नसल्यानमुळे नेवासकरांमध्ये संतापाची तीव्र भावना उसळून आल्यामुळे हा मोर्चा शहरात एका ठिकाणी झालेली बैठकीनंतर नेवासा पोलीस स्टेशनवर असंख्य नेवासकरांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला.
नेवासा येथील रहिवासी शंतनू पोपट वाघ हे १६ ऑगस्ट रोजी घरून त्यांच्या जानकी स्टोन क्रेशर खडका फाटा येथे जात असताना पांढऱ्या रंगाच्या एका बोलेरो गाडीने नेवासा मार्केट कमीटीपासून पाठलाग करत त्रिमुर्ती पब्लिक स्कुल जवळ कट रचून पाठीमागील बाजुने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघाताचा बनाव करुन घातपात करण्याच्या उद्देशानेच धडक दिलेली असून या अपघातात शंतनू वाघ हे गंभीर जखमी झालेले असून रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहेत.
याबाबत रितसर फिर्याद दाखल करुनही नेवासा पोलिसांनी आरोपीला अटक न केल्यामुळे नेवासकरांतून संताप व्यक्त होत आहे. नेवासा पोलीसांनी आरोपींना तात्काळ अटक करावी अन्यथा कुठलीही पूर्व सुचना न देता कुंटुबासह अंदोलन,रस्तारोको,आमरण उपोषण करण्यात येईल असा इशाराही यावेळी दिला. यावेळी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करताना पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी सर्व मोर्चेकरी नागरिकांना शांत करत लवकरात लवकर आरोपी गजाआड करणार असल्याची ग्वाही दिली.





