37 वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेला 3 डिसेंबरला पहाटे प्रारंभ

पुणे – संपूर्ण देशात नावाजल्या जात असलेल्या 37 व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनला येत्या 3 डिसेंबरला पहाटे 3ः30 वाजता प्रारंभ होणार आहे, अशी माहिती पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ट्रस्टचे विश्वस्त ऍड. अभय छाजेड यांनी दिली आहे. सणस मैदान येथील हॉटेल विश्व चौकातून या 42 पूर्णांक 195 किमीच्या महिला – पुरुष पूर्ण मॅरेथॉनला येत्या 3 डिसेंबर रोजी पहाटे 3. 30 वाजता फ्लॅग ऑफ करण्यात येईल तसेच पहाटे 4. 0 0 वा. महिला – पुरुष हाफ मॅरेथॉन सुरु होईल.
ही पूर्ण मॅरेथॉन सणस मैदान हॉटेल विश्व चौक – सारसबाग – सेनापती बापट पुतळा- सिंहगड मार्ग- नांदेड सिटीतील सर्कल येथे वळसा घालून सणस मैदान येथे परत येईल. व पुन्हा त्याच मार्गाने दुसरी फेरी पूर्ण करून सणस मैदान येथे 42. 195 किमीचा टप्पा पार करेल. तसेच महिला – पुरुषांची हाफ मॅरेथॉन सणस मैदान – सारसबाग -सेनापती बापट पुतळा- सिंहगड मार्ग – नांदेड सिटी सर्कल येथे वळसा घालून त्याच मार्गाने सणस मैदान येथे 21 किमीचा टप्पा पार करेल.
याशिवाय 10 किमी, 5 किमी, व्हील चेअर , फॅमिली रन देखील असणार आहेत. एकूण 12 हजारहून अधिक स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. याच्या प्रवेशाची अंतिम मुदत 20 नोवेंबर असून मॅरेथॉन भवन, मित्रमंडळ चौक ,पर्वती, पुणे -09 येथे प्रत्यक्ष सकाळी 10 ते सायंकाळी 6 . 00 या वेळेत प्रवेश अर्ज भरता येऊ शकेल. या स्पर्धेतील विजेत्यांना पुणे महानगर पालिकेतर्फे 35 लाख रुपयांची बक्षिसे दिली जातील.
यंदा इथियोपिया, केनिया, टांझानिया, मॉरिशस इत्यादी देशांतून आत्तापर्यंत 60 हून अधिक स्पर्धकांनी नावनोंदणी केली आहे. स्पर्धा संपल्यानंतर सणस मैदान येथे सकाळी 8 वाजता पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण संपन्न होईल. यंदा पर्यावरण संवर्धनासाठी पळा हे घोषवाक्य असणार आहे.
सर्व सुविधा असतील सज्ज
यासाठी व्हॉलेन्टीअर्स, डॉक्टर व नर्सेस यांची पथके, ऍमब्युलन्स सेवा, मार्गावर पाणी व एनर्जी ड्रिंकची व्यवस्था आदींची पूर्व तयारी सुरु झाली आहे. डॉक्टर पथकाचे नेतृत्व डॉ. राजेंद्र जगताप करत आहेत. गेली दोन वर्षे नाईट मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती मात्र मार्गावर रात्री 12 नंतरही जास्त वाहतूक असल्यामुळे यंदा पहाटे 3.30 वाजता पूर्ण व त्यानंतर अर्ध मॅरेथॉन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणेकर क्रीडा प्रेमी दरवर्षीप्रमाणे याही मॅरेथॉनला मोठा प्रतिसाद देतील असा विश्वास वाटतो.





