भारीच की.! मकरंद अनासपुरे करणार छोट्या पडद्यावर जबरदस्त कमबॅक; ‘या’ मालिकेत साकारणार मुख्य भूमिका

मुंबई – आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण करणारे मराठी कलाविश्वातील हरहुन्नरी अभिनेते ‘मकरंद अनासपुरे’ पुन्हा एकदा आपल्या लाडक्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मकरंद अनासपुरे लवकरच ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ या नव्या मालिकेतून आपल्या भेटीला येणार आहेत. सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी या लेखक-दिग्दर्शक जोडीच्या नव्या मालिकेबद्दल प्रेक्षकांच्या मनात सध्या खूपच उत्सुकता आहे.
दरम्यान, मकरंद अनासपुरे यांना अनेक वर्षांनंतर पुन्हा मालिकेत पाहणं म्हणजे प्रेक्षकांसाठी वेगळी पर्वणी असेल. ही एका वेगळ्या धाटणीची आणि विषयाची मालिका असून, यामध्ये अभिनेते मकरंद अनासपुरे हे ‘दिनकर त्र्यंबक गुळस्कर’ नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहेत. या संदर्भातील एक पोस्ट देखील त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे. गेली काही वर्ष ते फक्त चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या भेटीला येत होते.
पण आता मोठ्या कालावधीनंतर मकरंद अनासपुरे छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहेत. सध्या त्यांच्या या नव्या मालिकेला प्रेक्षकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, आजवरच्या चित्रपटांमध्ये आपण पाहत आलेला त्यांचा विशेष अंदाज आपल्याला आता ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ या मालिकेतून पाहायला मिळणार आहे. त्यामुळे त्यांचे चाहते देखील खुश झाले आहेत.






