‘त्या’ एसटी ड्रायव्हर, कंडक्टरचे अखेर निलंबन !

अकोला : पंढरपूर-अकोट एसटी बस चालक आणि वाहकाने मद्यधुंद अवस्थेत बस चालवल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यात प्रवाशांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. यामुळे 37 प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. बीड पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, एसटी प्रशासनाने चालक संतोष रहाटे आणि वाहक मनीष झालटे यांना निलंबित केले आहे. या प्रकरणी चौकशी सुरू असून, आरोप सिद्ध झाल्यास दोघांवर बडतर्फीची कारवाई होऊ शकते.
वारकऱ्यांच्या प्रवासात धोका
पंढरपूरच्या वारीसाठी एसटी महामंडळ दरवर्षी विशेष नियोजन करते. यानुसार, अकोट आगाराची एमएच-14-6140 क्रमांकाची बस वारकऱ्यांना घेऊन पंढरपूरला गेली होती. परतीच्या प्रवासात, दुपारी 4 वाजता बस अकोटकडे निघाली. यावेळी चालक संतोष रहाटे आणि वाहक मनीष झालटे कर्तव्यावर होते. बसमध्ये 37 प्रवासी, यात महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश होता. बीड-अंबड मार्गावर प्रवाशांना दोघांच्याही वागणुकीवर संशय आला. वाहक दारूच्या नशेत खाली पडला, तर चालकाला बस चालवणे जड जात होते.
प्रवाशांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड
प्रवाशांनी दोघांना हटकले, पण ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. यानंतर प्रवाशांनी एसटी प्रशासन आणि पोलिसांशी संपर्क साधला. काहींनी नातेवाइकांनाही माहिती दिली. बीड पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मद्यधुंद चालक आणि वाहकाला ताब्यात घेतले. एसटी प्रशासनाने दुसरे चालक आणि वाहक पाठवून बस पुढील प्रवासासाठी रवाना केली.
चौकशी आणि कठोर कारवाईचे संकेत
अकोला विभाग नियंत्रकाने चालक संतोष रहाटे आणि वाहक मनीष झालटे यांना निलंबित केले आहे. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. चौकशीत आरोप सिद्ध झाल्यास दोघांवर बडतर्फीची कारवाई होण्याची शक्यता आहे. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये संताप असून, एसटी प्रशासनाने अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.





