प्रभात वृत्तसेवा शिरूर – आगामी निवडणुका शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलाने गुन्हेगारीविरोधात कडक पावले उचलली आहेत. याच अनुषंगाने शिरूर तालुक्यातील गोलेगाव येथील सराईत आणि धोकादायक गुन्हेगार दीपक बबन गुंजाळ (वय ३३) याला महाराष्ट्र प्रतिबंधक नजरकैद कायदा (एम.पी.डी.ए.) अंतर्गत नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणारे, वाळू तस्कर, महिलांविरोधातील गुन्हे करणारे आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. गुंजाळविरुद्ध यापूर्वी बेकायदेशीर अग्नीशस्त्र बाळगणे, घातक हत्यारांनी मारहाण करणे, जबर दुखापत पोहोचवणे, शिवीगाळ व दमदाटी करणे अशा स्वरूपाचे तीन गंभीर गुन्हे दाखल होते.तो सराईत व धोकादायक असल्याने शिरूर पोलीसचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी त्याच्याविरुद्ध एम.पी.डी.ए. अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे सादर केला होता. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी प्रस्तावाचे परीक्षण करून तो जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे जितेंद्र डुडी यांच्याकडे पाठविला. सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ नये, या दृष्टीने जिल्हादंडाधिकाऱ्यांनी एम.पी.डी.ए. कायदा १९८१ (सुधारित अधिनियम २०२५) अन्वये दीपक गुंजाळ याला स्थानबद्ध करण्याचा आदेश पारित केला. जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये शिरूर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी संयुक्त कारवाई करत १३ डिसेंबर २०२५ रोजी दीपक गुंजाळ यास ताब्यात घेऊन मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे दाखल केले. या कारवाईमुळे शिरूर शहर व तालुक्यात गुन्हेगारी प्रवृत्तीवर मोठा आळा बसला असून, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.