Nivedita Saraf : ‘तो अनुभव शब्दांत सांगता येणार नाही’; अक्कलकोटमधील आठवण सांगताना निवेदिता सराफ झाल्या भावुक
Nivedita Saraf : निवेदिता सराफ या स्वामी समर्थांच्या निस्सीम भक्त आहेत. विशेष म्हणजे, त्यांची स्वामीभक्ती पती अशोक सराफ यांच्यामुळे सुरू झाली.

Nivedita Saraf : मराठी मनोरंजनविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. या फोटोमध्ये त्या श्री स्वामी समर्थांचे अर्धनारीश्वर रूप धारण केलेल्या दिसत आहेत. त्यांच्या या अनोख्या रूपाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र, या फोटोसोबतच त्यांनी सांगितलेला अक्कलकोटमधील एक भावुक अनुभवही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
निवेदिता सराफ या स्वामी समर्थांच्या निस्सीम भक्त आहेत. विशेष म्हणजे, त्यांची स्वामीभक्ती पती अशोक सराफ यांच्यामुळे सुरू झाली. नुकत्याच दिलेल्या एका दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या आध्यात्मिक प्रवासाबद्दल आणि अक्कलकोटमधील अविस्मरणीय प्रसंगाबद्दलचा त्यांना आलेला अनुभव शेअर केला.
निवेदिता म्हणाल्या की, “सुरुवातीला त्यांना स्वामी समर्थांविषयी फारशी माहिती नव्हती. मात्र, पती अशोक सराफ हे जवळपास सहा वर्षांपासून स्वामींची भक्ती करत होते. या काळात त्यांनी मांसाहारही सोडला होता. एकदा चित्रपटाच्या चित्रीकरणानिमित्त अशोक सराफ सोलापूर परिसरात असताना त्यांनी सहा वर्षांच्या व्रताचे समर्पण करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मंदिरात जाऊन पोथी वाचण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.”
पुढे बोलताना निवेदिता यांनी सांगितले की, “अशोक सराफ आणि निर्माते सतीश कुलकर्णी काकड आरतीच्या वेळी मंदिरात गेले. मात्र, त्यावेळी मंदिरात एकही भाविक नव्हता. दोघांनी शांततेत बसून संपूर्ण अध्यायाचे वाचन केले आणि स्वामींचे दर्शन घेतले. त्यानंतर हळूहळू मंदिरात भाविक येऊ लागले. हा प्रसंग अशोक सराफ यांनी निवेदिता यांना सांगितला.
View this post on Instagram
हा अनुभव ऐकल्यानंतर निवेदिता यांनाही स्वामींचे चरित्र वाचण्याची इच्छा झाली. त्यांनी स्वामींचा ग्रंथ आणला आणि त्यांचे चरित्र वाचण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्या स्वतः अक्कलकोटला दर्शनासाठी गेल्या. वटवृक्ष मठ आणि समाधी मठाला भेट दिल्यानंतर आलेला अनुभव सांगताना निवेदिता भावुक झाल्या.
स्वामी समर्थांनी समाधी घेतलेल्या ठिकाणी गेल्यानंतर नेमके काय वाटले, हे शब्दांत सांगणे कठीण असल्याचे त्यांनी म्हटले. हा प्रसंग सांगताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. निवेदिता सराफ यांनी सांगितलेला हा अनुभव त्यांच्या स्वामीभक्तीची आणि श्रद्धेची प्रचिती देणारा ठरत आहे.






