Thane News : अवैध मिक्स हायड्रोकार्बन ऑईल साठ्यावर धाड; 1.20 कोटींचा मुद्देमाल जप्त
अंबरनाथ तालुक्यात उसाटणे परिसरात अवैधरित्या साठवून ठेवलेल्या मिक्स हायड्रोकार्बन ऑईलच्या मोठ्या साठ्यावर राज्य दक्षता पथकाने रविवारी धडक कारवाई (Thane News) करत, सुमारे एक कोटी २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Thane News : अंबरनाथ तालुक्यात उसाटणे परिसरात अवैधरित्या साठवून ठेवलेल्या मिक्स हायड्रोकार्बन ऑईलच्या मोठ्या साठ्यावर राज्य दक्षता पथकाने रविवारी धडक कारवाई (Thane News) करत, सुमारे एक कोटी २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणात संबंधित आरोपींविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, अवैध इंधन साठवणूक आणि काळाबाजाराविरोधातील ही महत्त्वपूर्ण कारवाई (Thane News) मानली जात आहे.
नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राज्य दक्षता पथकाने उसाटणे भागातील न्यूओ लॉजिस्टिक पार्क परिसरात, राज्यस्तरीय प्लॉट क्रमांक २० समोर छापा टाकला. कारवाईदरम्यान टँकरचे सील तोडून मिक्स हायड्रोकार्बन ऑईलची बेकायदेशीर साठवणूक व देवाणघेवाण सुरू असल्याचे उघडकीस आले. दोन व्यक्ती या प्रकारात प्रत्यक्ष सहभागी असल्याचे आढळून आले.
पथकाने घटनास्थळी तपासणी केली असता एक टँकर पूर्णपणे भरलेला आढळला. या टँकरमध्ये सुमारे २९ हजार ७०० किलो मिक्स हायड्रोकार्बन ऑईल असल्याचे निदर्शनास आले. तसेच आणखी एक टँकर घटनास्थळी उभा असून त्यामध्ये इलेक्ट्रिक मोटारीच्या सहाय्याने इंधन साठवण्याचे काम सुरू असल्याचे आढळले. याशिवाय टेम्पोमध्ये २०० लिटर क्षमतेच्या प्लास्टिक बॅरलमध्ये तेलाची बेकायदेशीर साठवणूक (Thane News) सुरू होती.
या वाहनात २२० लिटर क्षमतेचे २० रिकामे प्लास्टिक बॅरल्स देखील आढळून आले. घटनास्थळी ८० रिकामे बॅरल्स, एक इलेक्ट्रिक मोटार आणि एक एअर ऑपरेटेड डायाफ्राम पंप जप्त करण्यात आला. या सर्व साहित्य, वाहने आणि इंधनासह एकूण सुमारे एक कोटी २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधितांकडे आवश्यक परवाने किंवा वैध कागदपत्रे नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.






