Thane News : 4 वर्षांच्या चिमुरड्याच्या तत्परतेमुळे खाडीत बुडणाऱ्या व्यक्तीचे वाचले प्राण
ठाण्यातील अवघ्या चार वर्षांच्या वरुण निकाते या लहानग्याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे (Thane News) एका ३० वर्षीय व्यक्तीचे प्राण वाचले आहेत. वरुणने वेळेवर पोलिसांना माहिती दिली नसती, तर ती व्यक्ती ठाण्याच्या खाडीत वाहून गेली असती.

Thane News : ठाण्यातील अवघ्या चार वर्षांच्या वरुण निकाते या लहानग्याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे (Thane News) एका ३० वर्षीय व्यक्तीचे प्राण वाचले आहेत. वरुणने वेळेवर पोलिसांना माहिती दिली नसती, तर ती व्यक्ती ठाण्याच्या खाडीत वाहून गेली असती.
ठाणे (Thane News) आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासिन तडवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास कळवा नवीन पुलाजवळ, पोलीस चौकीच्या अगदी समोर घडली.
नौशाद महरूम (वय ३०) नावाची एक व्यक्ती खाडीतील पाण्याचा अंदाज न आल्याने वेगाने पाण्यात बुडू लागली. तिथेच जवळ असलेल्या चार वर्षांच्या वरुण निकाते याने हा प्रकार पाहिला. त्याने अजिबात वेळ न घालवता थेट जवळच असलेल्या वाहतूक पोलीस चौकीकडे धाव घेतली आणि तिथल्या पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच तीन हेड कॉन्स्टेबल तातडीने घटनास्थळाकडे धावले. सुदैवाने, त्याच वेळी तिथून अग्निशामक दलाचे एक वाहन जात होते, पोलिसांनी ते वाहन थांबवले. पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीची गंभीर अवस्था पाहून अग्निशामक दलाचे स्टेशन ऑफिसर संदीप कदम आणि चालक गणेश गाढवे यांनी कोणताच विचार न करता खाडीच्या उसळत्या पाण्यात उड्या घेतल्या.
जवानांनी १५ मिनिटे पाण्याच्या प्रवाहाशी लढा देत अखेर त्या व्यक्तीला सुखरूप बाहेर काढले. वाचवण्यात आलेला युवक मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्यासारखा वाटत होता. या थरारक बचावकार्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, नागरिकांनी चिमुरड्या वरुणच्या हुशारीचे आणि अग्निशामक दलाच्या जवानांच्या धैर्याचे कौतुक केले आहे.
ठाण्याच्या (Thane News) महापौर शर्मिला पिंपलोळकर आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी देखील अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांच्या आणि जवानांच्या या अतुलनीय शौर्याची विशेष प्रशंसा केली आहे.






