ठाणे : अंबरनाथ परिसरात असलेल्या एका फार्मा कंपनीला सोमवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत कारखान्याचा मोठा भाग जळून खाक झाला आहे. या आगीत अनेक वाहनेही जळून खाक झाली. आग विझवत असताना स्फोटांचे आवाजही ऐकू आले, त्यामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळाताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र आग मोठी असल्याने मोठे नुकसान झाले आहे. अद्याप आगीचे कारण समजू शकले नसून, तपास सुरू आहे. कंपनीत झालेल्या स्फोटामुळे घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मिळालेल्या माहितीनुसार अंबरनाथ शहरातील आनंदनगर भागात एमआयडीसी असून या एमएसडीसीमध्ये रेसिनो ड्रग्ज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. या कंपनीत विविध औषध तयार केली जातात. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कंपनीत रविवारी रात्री साडे नऊच्या सुमारास रसायनामुळे आग लागल्याने कंपनीतील प्लांटमध्ये स्फोट झाला. त्यानंतर या कंपनीतून केमिकल बाहेर वाहत येत असल्याने शेजारच्या कंपन्यांनाही आगीची झळ बसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. कंपनी बाहेरच्या नाल्यामध्ये रसायन पसरल्याने इथेही काही काळ भडका उडाला. त्यामुळे येथे गोंधळाची स्थिती निर्माण होऊन आजूबाजूच्या चार कंपन्यांना आग लागली. या आगीत कंपनीतील प्लँट ऑपरेटर गंभीर जखमी झाला.अनिल यादव असे गंभीर जखमी झालेल्या प्लँट ऑपरेटरचं नाव आहे. हा स्फोट झाला तेव्हा कंपनीत 10 ते 12 कामगार काम करत असल्याची माहिती त्यांनी दिली.