Thane News : ठाण्यातील नाल्याच्या पाहणीदरम्यान आव्हाड – मुल्ला आले आमनेसामने; घटनास्थळी तणावाचे वातावरण

ठाणे : ठाण्यातील राबोडी येथील क्रांतीनगर नाल्याच्या पाहणीदरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला आमनेसामने आले. दोन्ही राष्ट्रवादीचे नेते व कट्टर विरोधक एकाच वेळी आमनेसामने आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही नेत्यांनी माध्यमांशी बोलताना एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले.
पावसाळीपुर्व कामांवरून ठाण्यतील राजकारण तापले असताना, राबोडी येथे क्रांतीनगर नाल्याच्या सफाईचे काम सुरू आहे. अवकाळीने स्थानिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले होते. त्या पार्श्वभूमीवर आव्हाड व नजीब मुल्ला देखील एकाच वेळी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पोहोचले. दोन्ही गट समोरासमोर असल्याने काही काळासाठी वातावरण तापले होते. त्यावेळी मुल्ला यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन करत घोषणाबाजी रोखली.
‘राबोडी परिसरातील नाल्यावरील पुलाच्या बांधकामांचा राडारोडा नाल्यात टाकल्यामुळे खाडी आणि नाल्यामधील सामायिक ओढा बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे आढळून आले. ठाणे महापालिका अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या भ्रष्टाचारामुळेच नालेसफाईचे तीनतेरा वाजले असून ठाणेकरांचा कराचा पैसा कळव्याच्या खाडीत वाहून जात आहे,’ असा आरोप आव्हाड यांनी यावेळी केला.
‘गेल्या चार वर्षांपासून याठिकाणी काम सुरू आहे. अवकाळी पावसामुळे आजूबाजूच्या घरांमध्ये पाणी शिरले ही वस्तुस्थिती असून याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो. मात्र या नाल्याची रुंदी वाढवण्यासोबतच येथे रस्ता तयार करण्याचेही काम सुरू आहे. नशिबाने निवडून आलेल्या आमदारांनी आम्हाला तांत्रिक गोष्टी शिकवू नयेत’, असा टोला यावेळी मुल्ला यांनी आव्हाड यांचे नाव न घेता लगावला.





