बँकॉक : थायलंडचे माजी पंतप्रधान थाकसेन शिनावात्रा आज अचानक देशातून बाहेर निघून गेले. न्यायालयाने त्यांच्याविरोधात शिक्षा सुनावण्याच्या पाच दिवस आगोदर त्यांनी देशातून बाहेर पळ काढला आहे.आणि संवैधानिक न्यायालयाने त्यांची मुलगी पेटोंग्टार्न शिनावात्रा यांना पंतप्रधानपदावरून काढून टाकल्यानंतर एका आठवड्यानंतर ते देशातून निघून गेले आहेत. शुक्रवारी संसदेत पेटोंग्टार्न यांच्या जागी नवीन पंतप्रधान निवडण्यासाठी आणि नवीन सरकार स्थापन करण्यासाठी मतदान होणार होते. त्याचे खाजगी विमान सिंगापूरला जात आहे, असे थाकसिन शिनावात्रा यांनी बँकॉकच्या डॉन मुआंग विमानतळावर थाई इमिग्रेशन अधिकाऱ्यांना सांगितले. त्यांच्याकडे देश सोडण्यापासून रोखणारा कोणताही अटक वॉरंट किंवा न्यायालयाचा आदेश नव्हता. म्हणून त्यांच्या विमानाला संध्याकाळी ७ वाजल्यानंतर लगेचच उड्डाण करण्याची परवानगी देण्यात आली असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. बॉम्बार्डियर बीडी-७०० हे खाजगी जेट विमान सुरुवातीला दक्षिणेकडे सिंगापूरच्या दिशेने गेले होते आणि नंतर अचानक पश्चिमेकडे वळून दोन घिरट्या घालून भारताच्या दिशेने निघाले, असल्याचे फ्लाईट ट्रॅकिंग डाटाच्या विश्लेषणातून निष्पन्न झाले. आपण वैद्यकीय तपासणीसाठी सिंगापूरला जात असल्याचे थाकसिन शिनावात्रा यांनी एक्सवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. सेलेटर विमानतळावर आपले विमान उतरत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तेथून थाकसिन शिनावात्रा संयुक्त अरब अमिरातीमध्ये दुबई येथे गेले असण्याची शक्यता आहे. संभावय् तुरुंगवासाची शिक्षा चुकवण्यासाठी ते देशातून पळून गेले असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र आपण मंगळवारी थायलंडला परत येणार असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.