थायलंडच्या पंतप्रधान पेतोंगतार्न शिनावात्रा यांना पदावरून हटवलं; कंबोडियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या वडिलांना फोनवर ‘काका’ म्हणणं भोवलं

बँकॉक – थायलंडच्या संविधानिक न्यायालयाने शुक्रवारी देशाच्या पंतप्रधान पेतोंगतार्न शिनावात्रा यांना पदावरून बर्खास्त केले. न्यायालयाने आपल्या निर्णयात शिनावात्रा यांनी कोणतीही बेइमानी केली नसल्याचे नमूद केले, मात्र कंबोडियाच्या माजी पंतप्रधान आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष हुन मानेट यांचे वडील हुन सेन यांच्यासोबत झालेल्या टेलिफोन संभाषणामुळे त्यांनी नैतिकतेचे उल्लंघन केले, असा ठपका ठेवला आहे. या फोन कॉलनंतर दोन्ही देशांत सीमावाद उफाळून आला आणि सैन्य चकमकींमध्ये तब्बल ४० हून अधिक जणांचा मृत्यू झाला, तर सुमारे तीन लाख नागरिक विस्थापित झाले.
वादग्रस्त व्यावसायिक व थायलंडचे माजी पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा यांची कन्या असलेल्या ३८ वर्षीय पेतोंगतार्न यांना जुलै महिन्यातच निलंबित करण्यात आले होते. ३६ सिनेटरांनी दाखल केलेल्या याचिकेत त्यांच्यावर नैतिक मानकांचे पालन न करणे, प्रामाणिकपणाचा अभाव व देशहिताकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप करण्यात आले होते.
शिनावात्रा यांनी हुन सेन यांना ‘काका’ म्हणून संबोधले होते. हुन सेन यांनी मात्र हा फोन कॉल सार्वजनिक करून सोशल मीडियावर टाकला. त्यानंतर विरोधकांनी शिनावात्रा यांनी संभाषणादरम्यान कंबोडियाच्या सैन्य कमांडरला ‘प्रतिस्पर्धी’ म्हटल्याचा मुद्दा उचलून धरला. विरोधकांच्या मते, हे वक्तव्य थायलंडच्या सैन्याचा अपमान करणारे आहे.
या वादानंतर शिनावात्रा यांना पाठिंबा देणाऱ्या प्रमुख आघाडी पक्षाने सरकारपासून हात झटकले. सीमावर्ती तणाव उग्र होत जाऊन जुलै महिन्यातील रक्तरंजित संघर्षात परिवर्तित झाला. न्यायालयीन सुनावणीत शिनावात्रा यांनी नेहमीच थायलंडच्या हितासाठी काम केल्याचे सांगितले, मात्र न्यायालयीन निर्णयाने त्यांच्या राजकीय भवितव्यावर मोठा आघात केला आहे.
गेल्या १७ वर्षांत थायलंडच्या न्यायालयाने पदावरून हटवलेल्या पंतप्रधानांमध्ये पेतोंगतार्न शिनावात्रा या पाचव्या ठरल्या आहेत. तसेच अलीकडच्या काळात पदच्युत झालेल्या दुसऱ्या पंतप्रधान म्हणून त्यांची नोंद झाली आहे.

