Thackeray Targets to Fadnavis । राज्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार अनिल देशमुख आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत असल्याचे दिसत आहे. अगोदर अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पलटवार करत उत्तर दिले.त्यांच्या उत्तरानंतर आता पुन्हा अनिल देशमुखांनी फडणवीसांना आव्हान दिलं आहे. या सगळ्या प्रकरणावर आता ठाकरे गटाकडून भाष्य करण्यात आलंय. देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करतानाच भाजपाची ही सवयच असल्याची टीका ठाकरे गटाने केलीय. “..हा भाजपाचा अलिकडचा मूळ धंदा” Thackeray Targets to Fadnavis । शिवसेना (ठाकरे गट) चे मुखपत्र असणाऱ्या सामनामधून ठाकरे गटाकडून फडणवीस आणि भाजपवर टीका करण्यात आलीय. यामध्ये त्यांनी, “फडणवीस यांनी हे जे उपद्व्याप केले, त्याचे ‘पेन ड्राईव्ह’ पुरावे आपल्याकडे आहेत. ते आपण बाहेर काढू’, असे देशमुखांनी जाहीर करताच फडणवीस यांनी ‘आमच्याकडेही देशमुखांच्या काही क्लिप्स आहेत, त्या बाहेर काढू. मग बघा!’ असा दम भरला. म्हणजे फडणवीस यांनी भाजपच्या खऱ्या संस्कृतीचे दर्शन घडवलेच. विरोधकांचे फोन चोरून ऐकणे, फोन रेकॉर्ड करणे, व्हिडीओ क्लिप करण्यासाठी सरकारी यंत्रणा वापरणे व पुढे त्या माध्यमातून आपल्या राजकीय विरोधकांना ब्लॅकमेल करणे हा अलीकडचा मूळ धंदा झालाच आहे”, अशा शब्दांत ठाकरे गटाकडून टीका करण्यात आलीय. तसेच पुढे अग्रलेखात, “मुख्यमंत्री ठाकरे व इतर तिघांविरुद्ध आम्ही सांगतो ते आरोप करा, तशा प्रतिज्ञापत्रांवर सही करा. मग आम्ही हे सरकार पाडतो व तुमची अटक टाळतो’, असा हा सौदा होता”, असा दावाही ठाकरे गटाने केलाय. रश्मी शुक्ला प्रकरणावरून टीका Thackeray Targets to Fadnavis । दरम्यान, “राज्याच्या विद्यमान पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला यांनी त्या राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख असताना फडणवीस यांच्यासाठी किमान विसेक राजकीय विरोधकांचे फोन ‘चोरून’ ऐकले व या भयंकर गुन्ह्याची चौकशी ठाकरे सरकारच्या काळात सुरू झाली. शुक्ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पण भाजपाने आमदारांना विकत घेऊन महाविकास आघाडी सरकार पाडले. त्यानंतर गुन्हेगारी स्वरूपाची कृत्ये करणाऱ्या शुक्ला यांना सरळ राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नेमले. त्यामुळे ‘क्लिप्स’ वगैरे प्रकरणात फडणवीस यांना भलताच रस आहे”, असा टोलाही अग्रलेखात लगावण्यात आलाय. “देवेंद्र फडणवीसांनी भाजपातील अनेकांच्या क्लिप्स तयार करून त्यांना संपवले. संघाचे नेते संजय जोशी यांच्या बनावट वादग्रस्त क्लिप्स कोणी केल्या व प्रसारित केल्या हे जगाला माहीत आहे. ‘क्लिप्स’ करणे व लोकांना ब्लॅकमेल करणे हाच भाजपचा जोडधंदा असून त्या जोडधंद्यावरच त्यांचे राजकारण टिकून आहे”, असा आरोपही ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.