अन् ठाकरे-शिंदे बनले शेजारी; लोकसभेकडून राजकीय पक्षांना कार्यलयाचे वाटप

नवी दिल्ली : लोकसभा सचिवालयाने बुधवारी 18 व्या लोकसभेसाठी शिवसेनेसह 11 राजकीय पक्षांना संसद भवन संकुलातील कार्यालये दिली आहेत. यापैकी 10 पक्षांना संविधान सभेत कार्यालये मिळाली आहेत, तर सरकारचा प्रमुख सहयोगी तेलगू देसम (टीडीपी) या पक्षांना नवीन संसद भवनात त्यांच्या कार्यालयासाठी जागा मिळाली आहे. विषेष म्हणजे लोकसभा सचिवालयाने ठाकरे आणि शिंदे गटाला शेजारी कार्यालय दिली आहेत.
शिवसेनेतील फुटीनंतर दोन्ही गटांनी 17 व्या लोकसभेत मिळालेल्या कार्यालयावर दावा केला होता. अधिवेशनादरम्यान दोन्ही गटातील खासदार या कार्यालयात जाऊन बसायचे. परंतु केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि चिन्ह बहाल केल्यानंतर लोकसभा सचिवालयानेही शिंदे गटाकडे 128 क्रमांकाचे कार्यालय सुपूर्द केले होते. त्यानंतर ठाकरे गटाने लोकसभा सचिवालयाकडे स्वतंत्र कार्यालयाची मागणी केली होती. यानंतर आता लोकसभा सचिवालयाने ठाकरे गटाला स्वतंत्र कार्यालय दिले आहे.
लोकसभा सचिवालयाने ठाकरे गटाला शिवसेना शिंदे गटाच्या शेजारी कार्यालय दिले आहे. त्यामुळे जुन्या संसद भवनात म्हणजेच संविधान सभागृहात पक्के वैरी असणारे ठाकरे आणि शिंदे शेजारी झाले आहेत. शिंदे गटाला संसद भवनातील 128 आणि ठाकरे गटाला 128-A असे संविधान सदन देण्यात आले आहे. मात्र कार्यालयाचे वाटप करताना लोकसभा सचिवालयाने शिवसेना (शिंदे गट) असे नाव नोंदल्याने त्यावर शिवसेनेच्या खासदारांनी आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात शिवसेना खासदार लोकसभा सचिवालयाकडे दाद मागणार असल्याचे समजते.
राष्ट्रवादी काँग्रेसला 126-डी
दरम्यान, लोकसभा सचिवालयानुसार समाजवादी पक्षाला लोकसभेतील वाढलेल्या संख्येनुसार अतिरिक्त खोली देण्यात आली आहे. आता सपाला संविधान सदनात 130 आणि 126 संविधान सदन मिळाले आहेत. तर जेडीयूला 135 आणि 136 व टीडीपीला नवीन संसद भवनात F 09 संविदान सदन देण्यात आले आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसला 126-डी, आम आदमी पक्षाला 118-बी, आरजेडीला 125-2A, बीजेडीला 45-2, सीपीआयला 138 कार्यालयीन जागा मिळाली आहे. वायएसआर काँग्रेसला संविधान सदनातच तळमजल्यावर 5 वा कक्ष देण्यात आला आहे.





