Chandrapur News : चंद्रपुरात ठाकरेसेनेकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत
उत्सवाचा खर्च बाजूला ठेवून तो निधी पीडित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती संदीप गिऱ्हे यांनी दिली.

Chandrapur News – महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात तीव्र दुष्काळ आणि आर्थिक संकटामुळे आत्महत्या केलेल्या चार शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
गुरुवारी घेतलेल्या पत्ररपरिषदेत बोलताना उबाठाचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी सांगितले की, पक्षाचे प्रतिनिधी या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांकडे ही मदत सुपूर्द करणार आहेत.
याशिवाय, जिल्ह्यातील सुमारे २० गरजू आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत देखील वाटप केली जाणार आहे. सध्या महाराष्ट्र तीव्र दुष्काळाचा सामना करत असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
या संकटामुळे अनेक शेतकरी उद्ध्वस्त झाले असून हवालदिल झाले आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पक्षाने यंदाचे नवरात्र आणि दिवाळीचे सर्व उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
उत्सवाचा खर्च बाजूला ठेवून तो निधी पीडित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती संदीप गिऱ्हे यांनी दिली.






