भाजपच्या कार्यक्रमात टायगर श्रॉफच्या सत्कारासाठी राहुल देशपांडेंचं गायन थांबवलं ? ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर आक्रमक,म्हणाले “मराठी कलाकारांची चेष्टा…”

मुंबई – भाजपने आदित्य ठाकरेंच्या वरळीत मराठी माणसांसाठी कार्यक्रम घेतला खरा पण या कार्यक्रमात मराठी कलाकारांचा अपमान झाल्याचा आरोप आता ठाकरे गटाच्या नेत्यांकडून केला जात आहे. बॉलिवूड कलाकाराच्या सत्कारासाठी राहुल देशपांडे यांचं गाणं थांबवल्याचा आरोप करत भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.
ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात राहुल देशपांडेंना थांबूवून अभिनेता टायगर श्रॉफचा सत्कार होताना स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी राहुल देशपांडे आयोजकांना सांगताहेत की,एकदा मला थांबवलं तर मी पुन्हा गाणार नाही. यावेळी मंचावर भाजपा आमदार मिहीर कोटेचा हे देखील उपस्थित होते.अहिर यांनी ट्विट करत ‘हाच का मराठी कलाकारांचा सन्मान’ असा सवाल उपस्थित केला आहे. भाजप आयोजित मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव जांबोरी मैदान, वरळी येथे मराठी कलाकारांची चेष्टा असंही अहिर आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
हाच का मराठी कलाकारांचा सन्मान….!!!!
भाजप आयोजित मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव जांबोरी मैदान, वरळी येथे
मराठी कलाकारांची चेष्टा……..@abpmajhatv @TV9Marathi @saamTVnews @JaiMaharashtraN @zee24taasnews @ANI @ShivsenaComms pic.twitter.com/f7HxpcFbUV— Sachin Ahir (@AhirsachinAhir) October 20, 2022
वरळीमधील जांबोरी मैदानात दिवाळीनिमित्त भाजपाकडून ‘मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव’ कार्यक्रम आयोजित केला गेला. या कार्यक्रमाची चांगलीच चर्चा सुरु होती. कार्यक्रमानिमित्त भाजप आगामी निवडणुकांसाठी आदित्य ठाकरेंच्या वरळीमध्ये ताकद वाढवत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र आता या कार्यक्रमावरून ठाकरे गटाने थेट निशाणा साधल्यामुळे राजकीय वातावरण चांगलच तापू लागलं आहे.





