Maharashtra Politics : नारायण राणेंच्या विरोधात जाधवांची फटकेबाजी, म्हणाले “39 वर्षे तुम्ही काय म्हशी…”

मुंबई – मी शिवसेना सोडली आणि शिवसेना संपली. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद दिले आणि शिवसेना संपली. तुम्ही 39 वर्षे शिवसेनेत होतात असे म्हणतात, मग एवढी वर्षे काय दाढ्या करत होतात, असा सवाल करत आणि नारायण राणेंची (Narayan Rane) नक्कल करत ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी राणे आणि त्यांच्या पुत्रालाही लक्ष्य केले.
जाधव पुढे म्हणाले, तेव्हा अंधेरी-गोरेगावमध्ये म्हशींचे तबेले होते. शिवसेनेने काहीच केले नाही, तर 39 वर्षे काम करून मुख्यमंत्रिपदापर्यंत गेलेले तुम्ही काय म्हशी भादरत होतात का, असा सवाल त्यांनी केला.
संसदेत केरळचा प्रश्न विचारला की ते तामिळनाडूचे उत्तर द्यायचे. तामिळनाडूचा प्रश्न विचारला की हे केरळचे उत्तर द्यायचे. मग शेवटी ओम प्रकाश बिर्लांनी चूक लक्षात आणून दिल्यानंतर हे हो म्हणतात, असे म्हणत भास्कर जाधव यांनी राणेंचे हावभाव करून दाखवले. पूर्वी नाथ पै किंवा मधु दंडवते बोलायला उभे राहिले, तर देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहातून जात असतील, तर ते पुन्हा येऊन बसायचे. आता हे बोलायला लागले की सगळे खासदार बाहेर होतात, असेही जाधव यावेळी म्हणाले.
ठाकरे गटाचे सिंधुदुर्गातील आमदार वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ कुडाळमध्ये मोर्चा काढण्यात आला. त्यांच्या चौकशीचा निषेध यावेळी करण्यात आला. यावेळी बोलताना जाधव यांनी भाजपावर आणि शिंदे गटावर तोंडसुख घेतले.
National Investigation Agency : एनआयएची ‘या’ तीन राज्यांत सुमारे 50 ठिकाणी छापेमारी
राणे पिता-पुत्रांची नक्कल करत त्यांना खोचक शब्दांत टोला लगावला. राणेंचा त्यांनी कोंबडीवाले असाही उल्लेख केला. या तुमच्या जिल्ह्यातले कोंबडीवाले. त्यांनी रे रोडला एक प्रकल्प उभा केला. त्यात भ्रष्टाचार केला. त्यांच्यावर ईडीची कारवाई व्हावी, म्हणून किरीट सोमय्यांनी तेव्हा आरोप केले होते.
आज मंत्रिमंडळात बसलेले मंत्रिमंडळाबाहेर आमदार असणाऱ्या लोकांवर भाजपाकडून असेच आरोप केले जात होते. पण तेच लोक भाजपात गेले आणि एकदम साफ, स्वच्छ झाले. भाजपाच्या घराघरात निरमा पावडरचा कारखानाच तयार झाला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.




