Maharashtra Politics : कोकणात ठाकरे गटाला खिंडार; बड्या नेत्यांसह ८०० कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

सिंधुदुर्ग : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव-कुडाळ खोऱ्यात उद्धव ठाकरे गटातील प्रमुख नेत्यांसह सुमारे ८०० कार्यकर्त्यांनी आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या मोठ्या पक्षप्रवेशामुळे माणगाव खोऱ्यात शिंदे गटाची ताकद दुप्पट झाली असून, ठाकरे गटाची स्थानिक पातळीवर पकड कमकुवत झाल्याचे चित्र आहे.
माणगाव खोऱ्यातील घावनाळे जिल्हा परिषद मतदारसंघातील उबाठा विभागातील विभाग प्रमुख रामा धुरी आणि उपविभाग प्रमुख प्रशांत माडगूळ यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश झाला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख दीपक नारकर, विभाग प्रमुख दिनेश शिंदे आणि माणगाव विभाग प्रमुख सचिन धुरी उपस्थित होते.
माणगाव येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालयात गुरुवारी (२५ सप्टेंबर) झालेल्या या कार्यक्रमात उपवडे, वसोली, दुकानवाडे, मोरे, वाडोस, कांदुळी, महादेवाचे केरवडे आणि निळेली या गावांतील हजारो कार्यकर्ते सहभागी झाले. यामुळे सिंधुदुर्गात शिंदे शिवसेनेची संघटना आणखी मजबूत झाली आहे.
या प्रवेशाच्या निमित्ताने बोलताना आमदार निलेश राणे म्हणाले, “आमदार वैभव नाईक जेवढ्या विकास कामांचा निधी अडवण्यासाठी जिल्हा प्रशासनाला पत्र देतील, तेवढी दुप्पट कामे मी करून दाखवणार. गेल्या १० वर्षांचा बॅकलॉग लवकर पूर्ण करून प्रत्येक मतदाराला आमदार कसा असावा याचा अभिमान वाटेल, अशी खात्री देणार आहे. माणगाव खोऱ्यात रोजगार निर्मितीसाठी मोठे प्रकल्प राबवणार.” राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत, विकासाच्या नावाने राजकारण केले जात असल्याचा आरोप केला.
प्रवेश करणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये विभाग प्रमुख मोरे रामचंद्र धुरी, माजी उपसरपंच यशवंत धुरी, शाखाप्रमुख कैतन फेराव, माजी उपसरपंच अंकुश धुरी यांच्यासह अनेक नेत्यांचा यामध्ये समावेश आहे. हे सर्वजण निलेश राणेंच्या विकासकेंद्रित राजकारणावर विश्वास ठेवून ठाकरे गट सोडला.
या पक्षप्रवेशाने ठाकरे गटाला स्थानिक निवडणुकांमध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडून कोकणात आणखी पक्षप्रवेश घडवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.




