ठाकरे-फडणवीस भेट ! शिवसेनेच्या बड्या नेत्याचं विधान, म्हणाले महाराष्ट्राच्या विकासासाठी हे आवश्यक

मुंबई – मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप यांच्यात मोठ्या प्रमाणात राजकीय शह काटशह सुरू आहे. नुकत्याच घडलेल्या नारायण राणे प्रकरणावरून शिवसेना आणि भाजप आमने-सामने आले होते. मात्र शुक्रवारी ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील बंद दारआड चर्चा झाली. या चर्चेमुळे युतीच्या चर्चेला उधाण आलं आहे.
शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या असतानाच शिवसेनेच्या बड्या नेत्याने लक्षवेधी विधान केलं आहे. महाराष्ट्राच्या भल्यासाठी अशा भेटी होत असेल तर हे अपेक्षितच आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी अशा भेटी होणे गैर नाही, असं शिवसेना नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलं. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे विधान केलं.
ठाकरे-फडणवीस भेटीमुळे युतीच्या शक्यता व्यक्त करण्यात येत आहेत. याकडे सामंत यांचं लक्ष वेधलं असता ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचा प्रत्येक निर्णय शिवसैनिकांसाठी अंतिम असतो. यावेळी त्यांनी नारायण राणे यांना देखील इशारा दिला आहे.
उद्धव ठाकरे आमच्यासाठी देवाप्रमाणे आहेत. त्यांच्याबद्दल कोणी आगळीक करत असेल तर शिवसैनिक खपवून घेणार नाही, असं सामंत यांनी म्हटलं.





