Mumbai BEST Election : बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधू अन् महायुतीला चारली धूळ, कोण आहेत शशांक राव? त्यांच्या विजयामागील रहस्य काय?

मुंबई : दी बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत शशांक राव यांच्या पॅनेलने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत 21 पैकी 14 जागा जिंकून सत्ता काबीज केली. ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलला एकही जागा मिळाली नाही, तर महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनेलला 7 जागांवर समाधान मानावे लागले.
18 ऑगस्ट रोजी झालेल्या मतदानानंतर मंगळवारी मध्यरात्री निकाल जाहीर झाला. मात्र पुन्हा मतमोजणीमुळे नाट्यमय वळण आले. ही निवडणूक ठाकरे बंधूंच्या युतीसाठी लिटमस टेस्ट मानली जात होती, परंतु त्यांच्या दारुण पराभवाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या निवडणुकीत बलाढ्य महायुती आणि ठाकरे बंधूंना एकाचवेळी मात देणारे शशांक राव यांच्याविषयी सर्वत्र चर्चा सुरू आहे. कोण आहेत शशांक राव, आणि त्यांच्या विजयामागील रहस्य काय?
कोण आहेत शशांक राव?
शशांक राव हे मुंबईतील कामगार चळवळीतील एक प्रभावी नाव आहे. ते बेस्ट वर्कर्स युनियन आणि मुंबई ऑटो रिक्षा युनियनचे प्रमुख नेते आहेत. त्यांचे वडील, शरद राव, हे प्रख्यात कामगार नेते होते. त्यांनी बेस्ट, बीएमसी, हॉकर्स, ऑटो आणि टॅक्सी ड्रायव्हर्स युनियनच्या आंदोलनांना दिशा दिली.
शशांक राव यांनी वडिलांचा हा वारसा पुढे नेला असून, गेल्या अनेक वर्षांपासून ते कामगारांच्या प्रश्नांसाठी लढत आहेत. 2017 मध्ये त्यांनी मुंबईतील ऑटो रिक्षा युनियनच्या संपाचे यशस्वी नेतृत्व केले होते. त्यामुळे ते कामगारांमध्ये लोकप्रिय ठरले.
शशांक राव यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळोवेळी आंदोलने, चर्चा आणि पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या कार्याचा परिणाम म्हणून बेस्टच्या सुमारे 15 हजार मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत ठाकरे बंधू आणि महायुतीला नाकारले. यापूर्वी शशांक राव जनता दल युनाइटेडचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष होते, परंतु लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला होता. तरीही, या निवडणुकीत त्यांनी स्वतंत्रपणे बेस्ट वर्कर्स युनियन पुरस्कृत पॅनेल उभे करून दणदणीत यश मिळवले.
शशांक राव यांच्या विजयामागचे रहस्य काय?
शशांक राव यांच्या यशामागे त्यांचा कामगारांशी थेट संपर्क, त्यांच्या समस्यांबाबत सातत्यपूर्ण लढा आणि आंदोलनांचा अनुभव महत्त्वाचा ठरला. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि विश्वासार्ह नेतृत्व यामुळे त्यांना मोठा पाठिंबा मिळाला. त्यांच्या पॅनेलने 14 जागांवर विजय मिळवत बेस्ट पतपेढीवर गेल्या 9 वर्षांपासून असलेली ठाकरे गटाची सत्ता खालखेच खेचली.
विजयी उमेदवारांमध्ये मिलिंद आंबेकर, संजय आंब्रे, प्रकाश जाधव, उज्वल भिसे, भाग्यश्री डोंगरे (महिला राखीव), प्रभाकर धोंगडे (अनुसूचित जाती/जमाती) आणि किरण चांगण (भटक्या विमुक्त जाती) यांचा समावेश आहे.

