फोटोसेशनवेळी ठाकरेंनी शिंदेंच्या शेजारी बसणं टाळलं, विधानभवनात नेमकं काय घडलं?

मुंबई: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभानिमित्त विधानभवनाच्या आवारात आयोजित फोटोसेशनच्या वेळी एक अनपेक्षित प्रसंग घडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, उपसभापती नीलम गोऱ्हे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत फोटोसेशन सुरू होते.
यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे राजकीय वैर असलेले दोन नेते एकाच फ्रेममध्ये आले, पण त्यांच्यात कोणताही संवाद झाला नाही.
फोटोसेशनच्या वेळी एकनाथ शिंदे यांनी सभापती राम शिंदे आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यामध्ये जागा घेतली. थोड्याच वेळात उद्धव ठाकरे सभागृहातून बाहेर येऊन फोटोसेशनसाठी दाखल झाले. त्यांच्या आगमनाने सर्व नेते उठून उभे राहिले. यावेळी उद्धव ठाकरे कोणत्या खुर्चीवर बसणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ठाकरे यांनी सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस यांना नमस्कार केला.
उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांना आपल्या शेजारची खुर्ची ऑफर केली, जिथे एकनाथ शिंदे बसले होते. मात्र, ठाकरे यांनी ती खुर्ची न घेता नीलम गोऱ्हे यांच्या दुसऱ्या बाजूची खुर्ची निवडली, जिथे यापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे बसले होते. यामुळे फोटोसेशनमध्ये उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे आणि एकनाथ शिंदे एकाच रांगेत दिसले.
ठाकरे आणि गोऱ्हे यांच्यात यावेळी काहीशी चर्चा झाल्याचे दिसले, परंतु ठाकरे आणि शिंदे यांच्यात कोणताही संवाद झाला नाही.
गेल्या तीन वर्षांपासून राजकीयदृष्ट्या कट्टर विरोधक असलेले ठाकरे आणि शिंदे यांचे एकाच फोटोत येणे ही घटना चर्चेचा विषय ठरली. पहिल्या रांगेत फडणवीस, पवार, शिंदे, गोऱ्हे, राम शिंदे, बावनकुळे, नार्वेकर आणि दानवे बसले होते. या फोटोसेशनने राजकीय वर्तुळात नवी चर्चा घडवली असली, तरी ठाकरे-शिंदे यांच्यातील दुरावा कायम असल्याचे स्पष्ट झाले.





