Maharashtra Politics | एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंची साथ सोडत महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले. शिवसेनेतील या फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन गट निर्माण झाले. हे दोन्ही गट एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात. अनेकदा दोन्हीकडील नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरूच असतात. तसेच शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वादही न्यायालयात सुरू आहे. याचदरम्यान आता हे दोन्ही गट एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटांमध्ये चाकण नगराध्यक्ष निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत. शिंदे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनिषा सुरेश गोरे यांचा अर्ज भरण्यासाठी ठाकरेंचे आमदार बाबाजी काळे आणि शिंदेचे आमदार शरद सोनवणे उपस्थित होते. शिंदे आणि ठाकरे गटाच्या या युतीमुळे राजकीय वर्तुळात राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. Maharashtra Politics | मनिषा गोरे यांना नगराध्यक्षपदासाठी पाठिंबा मनिषा गोरे ह्या शिवसेनेचे माजी आमदार दिवंगत सुरेश गोरे यांच्या पत्नी आहेत. सुरेश गोरे यांच्याच नेतृत्वाखाली शिवसेनेने २०१६ मध्ये झालेली चाकण नगर परिषदेची निवडणूक जिंकली होती. दरम्यान, यावेळच्या निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाने मनिषा गोरे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाने मनिषा गोरे यांना नगराध्यक्षपदासाठी पाठिंबा जाहीर केला आहे. दिवंगत सुरेश गोरे यांना आदरांजली म्हणून हा पाठिंबा दिल्याचे ठाकरे गटाकडून सांगण्यात आले आहे. Maharashtra Politics | एका वृत्तवाहिनीशी बोलताना बाबाजी काळे म्हणाले की, “खेड-आळंदीचे दिवंगत आमदार सुरेश गोरे यांच्या निधनानंतर ही पहिली निवडणूक होत आहे. त्यांच्या पत्नी मनीषा गोरे नगराध्यक्षपदासाठी उभ्या आहेत. अशा प्रसंगी राजकारण बाजूला ठेवून, दिवंगत आमदारांना आदरांजली म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे. पण ही युती नाही.” पुढे ते म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे हा निर्णय फक्त चाकण नगराध्यक्ष पदापुरता मर्यादित आहे. तालुक्यातील राजगुरुनगर आणि आळंदी येथे आम्ही स्वबळावर लढत आहोत,” असेही बाबाजी काळे यांनी स्पष्ट केले. Maharashtra Politics | हेही वाचा : शेअर बाजाराची हिरव्या चिन्हावर ओपनिंग ! सेन्सेक्सची २२० अंकांची वाढ ; निफ्टीने २५,९७४ चा टप्पा ओलांडला