प्रभात वृत्तसेवा पुणे – सर्वोच्च न्यायालयाने सर्वच शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य परीक्षा परिषदेने येत्या दोन वर्षात चार वेळा म्हणजेच वर्षातून दोन वेळा टीईटी परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यानंतर एप्रिल-मे महिन्यात दुसरी टीईटी परीक्षा होणार आहे. त्यामुळे अपात्र उमेदवारांना टीईटीची आणखी संधी उपलब्ध होणार आहे. राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी आयुक्त डॉ. अनुराधा ओक उपस्थित होत्या. डॉ. बेडसे म्हणाले, येत्या रविवारी (दि. २३) होणाऱ्या टीईटी परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नियमित उमेदवारासह कार्यरत शिक्षकांनाही टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. त्यासाठी शिक्षकांना दोन परीक्षेची संधी देण्यात आली आहे. त्या पार्श्वूभूमीवर उमेदवारांची संख्या लक्षात घेता येत्या एप्रिल-मे महिन्यात आणखी एक परीक्षा घेण्यात येत आहे. येत्या दोन वर्षात चार परीक्षा घेण्याचे प्रस्तावित आहे. अर्थात वर्षातून दोन वेळा परीक्षा घेण्यात येणार असून, यातून अधिकाधिक उमेदवार तथा शिक्षकांना ही परीक्षा देता येईल. यंत्रणा सज्ज येत्या रविवारी होणाऱ्या टीईटी परीक्षेसाठी परीक्षा परिषदेने यंत्रणा सज्ज ठेवली आहे. टीईटी परीक्षा उमेदवारांची एकूण संख्या ४ लाख ७५ हजार ६६९ इतकी आहे. यात एकूण आठ माध्यमांपैकी मराठी माध्यमातील उमेदवार सर्वाधिक असून, त्याची संख्या ३ लाख २७ हजार १३५ इतकी आहे. राज्यातून ५ हजार २८३ दिव्यांग उमेदवारांनी परीक्षेला नोंदणी केली आहे. तसेच ४११ दिव्यांग उमेदवारांना लेखनिक पुरविला आहे. माजी सैनिक असलेले ४५ उमेदवार टीईटी परीक्षा देणार आहेत. परीक्षेसाठी उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर दीड तास आधी हजर राहणे आवश्यक आहे. आधारकार्डने पडताळणी टीईटी परीक्षेत गैरप्रकार होऊ नये याकरिता उमेदवारांच्या आधारकार्डची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यामुळे बोगस उमेदवारासारखे प्रकार टाळता येतील. त्याचप्रमाणे टीईटी उत्तीर्ण उमेदवारांची प्रमाणपत्रे सुरक्षित रहावी यासाठी डिजीलॉकरची सुविधा दिली जाणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या टीईटी परीक्षेपासून या निर्णयांची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती डॉ. बेडसे यांनी दिली. टीईटीसह शिष्यवृत्ती, टीईटी, टेट अशा सर्व परीक्षांमध्ये उमेदवारांच्या आधार कार्डची पडताळणी होणार आहे.