‘टेस्ला’ची होणार भारतात एन्ट्री, आधी कोणते कार मॉडेल लाँच करणार? जाणून घ्या

Tesla To Enter India | अब्जाधीश इलॉन मस्क यांच्या मालकीची इलेक्ट्रॉनिक कार निर्माता कंपनी टेस्ला भारतीय बाजारात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. मस्क आणि पंतप्रधान मोदींची भेट, त्यानंतर कंपनीकडून भारतात सुरू करण्यात आलेल्या नोकरभरतीमुळे याबाबतची शक्यता व्यक्त केली जात आहे.
टेस्लाने मुंबई, पुण्यात नोकरभरती सुरू केली आहे. जवळपास 15 जागांसाठी कंपनीने लिंक्डइन पेजवर जाहिरात देखील दिली आहे. याशिवाय, कंपनीकडून इलेक्ट्रिक कार उत्पादन निर्मिती प्लांट उभारण्यासाठी महाराष्ट्राचाही विचार केला जात आहे.
रिपोर्टनुसार, टेस्लाकडून सुरुवातीच्या टप्प्यात मुंबई, दिल्ली आणि बंगळुरूमध्ये कारची विक्री सुरू केली जाण्याची शक्यता आहे. कंपनीकडून भारतात कोणते मॉडेल सादर केले जाईल व हे मॉडेल अमेरिका, चीन किंवा जर्मनीपैकी कोणत्या देशातून आयात केले जाणार? या प्रश्नाचे उत्तर करांवर अवलंबून आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात टेस्लाकडून भारतात मॉडेल 3 आणि मॉडेल Y सादर करण्याची शक्यता आहे. या दोन्ही मॉडेल्सची सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 25,000 डॉलर्सपेक्षा अधिक आहे. त्यामुळे कंपनी भारतात हे मॉडेल किती किंमतीत सादर करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
टेस्ला भारतात कार उत्पादन सुरू करणार का? याबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, सद्यस्थितीमध्ये कंपनी आयात कारची विक्री सुरू करण्याची शक्यता आहे. दरम्यान, कंपनीने मुंबई आणि पुण्यात नोकरभरती सुरू केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून या पदांसाठी अर्ज करू शकतात.





