इलॉन मस्क यांच्या ‘टेस्ला’ कंपनीत काम करण्याची संधी, मुंबईत-दिल्लीत भरणार जागा; असा करा अर्ज

Tesla begins hiring in India | अब्जाधीश इलॉन मस्क यांची इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी ‘टेस्ला’ भारतात एन्ट्री करणार असल्याची शक्यता वारंवार व्यक्त केली जात होती. कंपनी भारतात इलेक्ट्रिक कारचे उत्पादन सुरू करणार असल्याचेही सांगितले जात होते. आता इलॉन मस्क-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर पुन्हा एकदा टेस्लाच्या भारतातील एन्ट्रीबाबत चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे कंपनीकडून भारतात नोकरभरती देखील केली जात आहे.
टेस्लाकडून विविध पदांसाठी जाहिरात देण्यात आली आहे. कंपनीकडून भारतात जवळपास 13 पदे भरली भरली जाणार आहेत. याबाबत कंपनीने लिंक्डइन पेजवर माहिती दिली आहे.
टेस्लाकडून 13 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. मुंबई आणि दिल्लीमध्ये सर्व्हिस टेक्नीशियनसह कमीत कमी 5 पदांवर भरती केली जात आहे. तर कस्टम एंगेजमेंट मॅनेजर आणि इतर पदांसाठी फक्त मुंबईत जागा रिक्त आहेत.
टेस्लाच्या वेबसाइटनुसार, मुंबईत सर्व्हिस अॅडव्हायझर, पार्ट्स अॅडव्हायझर, सर्व्हिस टेक्नीशियन, सर्व्हिस मॅनेजर, टेस्ला अॅडव्हायझर, स्टोअर मॅनेजर, बिझनेस ऑपरेशन्स अॅनालिस्ट, कस्टमर सपोर्ट सुपरवायझर, कस्टमर सपोर्ट स्पेशलिस्ट, डिलीव्हरी ऑपरेशन्स स्पेशलिस्ट, ऑर्डर ऑपरेशन्स स्पेशलिस्ट, इनसाइड सेल्स अॅडव्हायझर, कंज्यूमर एंगेजमेंट मॅनेजर या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र उमेदवार कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करू शकतात.
टेस्ला भारतात व्यापार सुरू करणार याबाबत मागील अनेक वर्षांपासून केवळ चर्चा सुरू आहेत. उच्च आयात शुल्काचे कारण देत टेस्लाने भारतात अद्याप व्यापार सुरू केला नव्हता. मात्र, भारताने आता 40 हजार डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या गाड्यांवरील कस्टम ड्युटी 110 टक्क्यांवरून 70 टक्क्यांवर कमी केली आहे. त्यामुळे आता टेस्ला भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेत त्यांचा व्यापार विस्तार करण्याची शक्यता आहे. टेस्लाच्या एन्ट्रीमुळे भारतातील इलेक्ट्रिक कार बाजारालाही फायदा होईल.





